नाशिक – मंत्रिपद न मिळाल्याने पक्ष नेतृत्वावर रोष प्रगट करुन भाजपशी जवळीक साधणारे माजीमंत्री तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे कौतुक केल्यामुळे भुजबळ समर्थक बुचकळ्यात पडले आहेत.

नाशिकमध्ये अजित पवार गटाचे आधीच दोन मंत्री आहेत. तिसरे मंत्रिपद पुन्हा नाशिकला दिले जाईल की नाही, याबद्दल साशंकता आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदावर लगेच दावा केल्यास ओबीसी समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. हे लक्षात घेत प्रारंभी आक्रमक भूमिका घेणारे भुजबळ प्राप्त परिस्थितीत मवाळ आणि पक्ष नेतृत्वाशी जुळवून घेताना दिसत आहेत.

महायुती सरकारमध्ये मंत्रिपदावरून डावलले गेल्यानंतर भुजबळ यांनी ओबीसींचे शक्ती प्रदर्शन करुन उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. पक्ष नेतृत्वाने अनुल्लेखाने टिकेची धार कमी केली. या काळात अजित पवार गटापासून दुरावलेले भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून भाजपच्या निकट गेल्याचे पाहण्यास मिळाले.

पक्ष नेतृत्वाने आपली अवहेलना केली, अशा शब्दांत भुजबळांकडून संताप व्यक्त झाला होता. रागाच्या भरात त्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने कच खाल्ली, राज्यसभेवेळी संधी डावलली, अशा बाबी देखील चव्हाट्यावर आणल्या होत्या. पक्षात एकाकी पडलेल्या भुजबळांची पावले तिसऱ्या बंडाच्या अर्थात भाजपच्या दिशेने पडत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. परंतु, तूर्तास तो विषयही थांबला आहे. उलट राज्यातील, मुख्यत्वे स्वपक्षातील घडामोडींमुळे भुजबळांनी सबुरीचा पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

लोकसभा, विधानसभेची लगेचच निवडणूक नाही. यामुळे पक्षांतराने काहीही साध्य होण्यासारखे नसल्याने त्यांनी तूर्तास अजित पवार गटाशी जुळवून घेण्याचे धोरण ठेवल्याचे लक्षात येते. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा असल्याची त्यांची प्रतिक्रिया तेच अधोरेखीत करते.

शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झालेले कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपदावर मध्यंतरी टांगती तलवार होती. या शिक्षेला सत्र न्यायालयाने अपील प्रलंबित असेपर्यंत स्थगिती दिल्याने हे मंत्रिपद रिक्त होण्याची शक्यता मावळली. पक्षाचे दुसरे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे इच्छुकांची आशा पल्लवीत झाली आहे. एका ओबीसी नेत्याच्या मंत्रिपदावर लगेच दावा करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे भुजबळ सध्या शांतपणे मोर्चेबांधणीच्या तयारीला लागल्याचे दिसते.

Story img Loader