राज्य सरकारमधील एक मंत्री म्हणतो पाऊसच झाला नाही. मंत्र्यांनाच माहीत नाही पाऊस झाला की नाही. या सरकारने राज्याची दुरवस्था केली असून, हे सरकार फक्त जाहिरातबाजी आणि पोस्टरबाजीवर चालत आहे, अशी टीका पारनेर येथील आमदार निलेश लंके यांनी केली. रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेप्रसंगी आयोजित सभेत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
हेही वाचा- पूर पातळी चिन्हांकनावरून महानगरपालिका-जलसंपदात आटय़ापाटय़ा
पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे- खेवलकर यांनी रावेर तालुक्यातील सांगवे, विटवे, निंबोल व ऐनपूर येथील ग्रामस्थांसमवेत संवाद साधला. याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे, युवती सभेच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, यात्राप्रमुख ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, रावेर तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील, जळगावचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार लंके म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून राज्यभरात कामे केली आहेत. माझ्या मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामांमुळे सिंचनाची सोय झाली आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी विकासाचे राजकारण केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून रोहिणी खडसे या कार्यरत आहेत. आगामी काळात त्यांना भरघोस मतांनी विधानसभेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले. गोरगरिबांना आनंदाचा शिधा- शिधाजिन्नस संच दिवाळी संपली, तरीही मिळाला नाही. ओल्या दुष्काळाने शेतकरी हतबल झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा- नंदुरबार पालिकेचे थकीत देयक त्वरीत मार्गी ; मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचा नंदुरबारकरांना अनुभव
आमदार खडसे म्हणाले की, गेली तीस वर्षे जातीपातीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण केले. त्या जोरावर तुम्ही मला निवडून दिले. काही लोकांनी दगाफटका केल्यामुळे गेल्यावेळी विधानसभेत रोहिणी खडसेंचा थोड्या मतांनी पराभव झाला. विरोधकांच्या मार्गातील एकमेव अडसर म्हणजे नाथाभाऊ होय. यामुळे मला काहीही करून अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ना काही खोटेनाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुरळीत करायच्या, असा त्यांचा प्रयत्न आहे. ते रोज म्हणताय की कुछ तो होनेवाला है! मात्र, असे काहीही होणार नाही; तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. शिंदे गटात गेलेल्या बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे. हळूहळू ही अस्वस्थता बाहेर येत आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही सुरुवात आहे, असा दावा खडसेंनी केला.
यावेळी रोहिणी खडसे यांनी, मतदारसंघातील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ही जनसंवाद यात्रा काढली आहे. मतदारसंघातील १८२गावांसह वस्त्यांवर ही यात्रा जाणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष अॅड. पाटील यांनी, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी रोहिणी खडसे यांनी सुरू केलेला जनसंवाद यात्रेचा स्तुत्य उपक्रम असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या अडीअडचणी सोडविल्या जातील; त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद होण्याचे आवाहन केले.
हेही वाचा- नाशिक : जरा धीर धरा, आपले दिवस परत येतील – छगन भुजबळ यांचे शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन
विकावू लोकांना घरी बसवा
युवती सभेच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी, मुक्ताईनगरचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत म्हणून पक्षाच्या मतांवर निवडून आले. त्यानंतर त्यांनी रंग बदलवत शिवसेनेला पाठिंबा दिला. तिथेही त्यांचे मन रमले नाही. ते ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेले. पन्नास खोके घेऊन त्यांचे ओके सुरू आहे. आगामी काळात तुम्ही अशा विकावू लोकांना घरी बसवा व रोहिणी खडसे यांना निवडून द्या, असे आवाहन केले.