अलीकडील काही दिवसांपासून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सहीचं पत्र अजित पवारांकडे असल्याचं वृत्त एका वर्तमानपत्राने छापलं आहे. या वृत्तानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना सुनील भुसारा यांनी म्हटलं, “वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. सभा झाल्यानंतर मुंबईत उष्माघातामुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांची चौकशी अजित पवारांनी केली. त्यामुळे या सर्व अफवा आहेत. आमच्यातील कोणाचीही भाजपाबरोबर जाण्याची भूमिका नाही.”
हेही वाचा : “अजित पवार यांच्यावर दबाव येऊ शकतो, असं…”, भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया
अजित पवारांबरोबर मोठा गट बाहेर पडेल, असं मत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं आहे. याबद्दल विचारल्यावर सुनील भुसारा म्हणाले, “पक्षाबरोबर राहणं हा सर्वांचा विषय आहे. अजित पवारांच्या प्रेमापोटी कोकाटे यांनी विधान केलं असेल. पण, आम्ही सर्वजण मिळून शरद पवारांबरोबर आहोत आणि मिळून राहू.”
हेही वाचा : “मला चर्चेला बोलावलं तर पक्षावरची नाराजी दूर होईल, पण…”, सत्यजीत तांबे यांचं सूचक वक्तव्य
“अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वडिल, मुलाचं नात आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हा आमचा परिवार आहे. त्यामुळे अजित पवार जातील आणि भाजपा त्यांना गळाला लावेल, असं वाटत नाही. लोकांच्या मागण्या, जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात,” अशी स्पष्टोक्ती सुनील भुसारा यांनी दिली आहे.