लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: अजित पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीत झालेल्या बंडात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अन्य स्थानिक आमदारांची साथ मिळाली असली तरी स्थानिक पातळीवर या निर्णयाचे अपेक्षित स्वागत झालेले नाही. भुजबळ संस्थापक असलेल्या समता परिषदेशी संबंधित काहींनी त्यांना साथ देण्याचे जाहीर केले. मात्र काहींनी भुजबळांविरोधात भूमिका घेतली. अनेक पदाधिकारी तसेच माजी खासदारांसह अन्य लोकप्रतिनिधी थांबा आणि निरीक्षण करण्याच्या भूमिकेत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ज्या प्रकारे शिंदे गटाने पक्षाचे नाव व चिन्हावर दावा सांगितला होता, त्याची पुनरावृत्ती राष्ट्रवादीच्या फुटीत होत आहे. त्यामुळे पक्षाचे नाव व चिन्ह कोणत्या गटाला मिळेल हे पाहून काही आमदारांची भूमिका निश्चित होणार असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर पसरलेल्या शांततेमुळे भुजबळांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. या पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सहा आमदार अजित पवार गटासोबत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यातील एक म्हणजे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन त्याची सुरुवात केली. राजभवनातील शपथविधी सोहळ्यात दिंडोरीचे आमदार तथा विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, देवळालीच्या सरोज अहिरे, कळवण-सुरगाण्याचे नितीन पवार हे उपस्थित होते. सिन्नरचे माणिक कोकाटे आणि निफाडचे दिलीप बनकर हे शपथविधी सोहळ्यास उपस्थित नव्हते. त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. खरेतर बनकर आणि कोकाटे हे दोन्ही दादा समर्थक म्हणून ओळखले जातात. कोकाटे यांनी याआधी राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याची भूमिका मांडली होती. यावेळी त्यांच्यासह बनकर हे सुध्दा मौन बाळगून आहेत.
आणखी वाचा-नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेची अधिक अडचण
शरद पवार यांनी सहा जुलै रोजी मुंबईत राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यानंतर निश्चितपणे भूमिका मांडता येईल, असे कोकाटे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या बंडानंतर बनकर हे देखील जिल्ह्यातच असल्याचे सांगितले जाते. स्थानिक समीकरणे, पक्षाचे नाव व चिन्ह कोणत्या गटाकडे जाईल हे पाहून काही लोकप्रतिनिधी कोणत्या गटात जायचे हे निश्चित करणार आहेत.
राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी अन्य कामामुळे पक्षांतर्गत घडामोडींबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. पुढील पाच ते सहा दिवसात चित्र स्पष्ट होईल. तेव्हा याबाबत भूमिका घेतली जाईल, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर अजितदादांचे नेतृत्व मानणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते असले तरी शरद पवार यांची साथ सोडून भाजपशी केलेली हातमिळवणी अनेकांना रुचलेली नाही. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलार हे कधीकाळी भुजबळांचे खंदे समर्थक होते. पक्षातील फुटीनंतर त्यांनी भुजबळांविरोधात भूमिका घेतली. आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-नाशिक : औद्योगिक प्रश्नांवर आता एकत्रित लढा; संघटनांचा निर्णय
मंत्रिपदाचा ना जल्लोष, ना स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर प्रदीर्घ काळापासून छगन भुजबळ यांचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे ते संस्थापक अध्यक्ष असलेल्या समता परिषदेतील अनेकांना राष्ट्रवादीत महत्वाची पदे मिळत होती. भुजबळ हे शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर स्थानिक पातळीवर त्याचे कुणी फारसे स्वागत केले नाही. येवल्यात काही समर्थकांनी जल्लोष केला. मात्र हा अपवाद वगळता शहर व इतरत्र तसेही घडले नाही. राष्ट्रवादीच्या कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी भुजबळ समर्थक काही पदाधिकारी वगळता कोणी फारसे फिरकले नाही. आदल्या दिवशी भुजबळांचे समर्थक मुंबईत असल्याने राष्ट्रवादी कार्यालयात शुकशुकाट असल्याचे सांगितले गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यात फारसा फरक पडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार हे भ्रमणध्वनी बंद करून बसले आहेत. शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे माध्यमांशी बोलण्यास उत्सुक नाहीत. भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला नाही. सहा तारखेची बैठक झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. भुजबळ नाशिकला आल्यानंतर जंगी स्वागताची योजना असल्याचे समर्थक सांगतात. या स्थितीमुळे भुजबळांचा राष्ट्रवादीतील फुटीला साथ देण्याचा निर्णय बरोबर होता की चुकला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबादास खैरे बडतर्फ
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणाऱ्या मंत्र्यांना पाठिंबा दिल्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंबादास खैरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केले आहे. छगन भुजबळ यांचे समर्थक म्हणून खैरे हे ओळखले जातात. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी त्याचे समर्थन केले होते. खैरे यांची कार्यशैली पक्षशिस्त आणि पक्षाच्या ध्येयधोरणांशी विसंगत असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी या पध्दतीची भूमिका घेणाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. खैरे यांना पक्षाचे सदस्यत्व तसेच युवक संघटनेतील पदांवरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.