जळगाव: जळगावकरांना नागरी सोयी-सुविधा पुरविण्यात महापालिकेला अपयश आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे टाळ वाजवून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली. शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते, साफसफाई, दिवाबत्ती, नगररचना विभागात सुरू असलेल्या बेकायदा परवानग्या यांसह विविध नागरी सोयी-सुविधा पुरविण्यात अपयश आल्याचा आणि महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाजवळ टाळ वाजवून करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा मंगला पाटील, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महानगराध्यक्ष लाडवंजारी यांनी, महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, ती निकृष्ट होत आहेत. महापालिका प्रशासन फक्त ठेकेदारांना पोसण्याचे काम करीत आहे. शहरात सफासफाईविना सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तो उचलला जात नाही. अनेक भागांत पथदिवे बंदच असतात. अमृत योजनेंतर्गत जलवाहिन्यांतून काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झाला असून, तो अवेळी व कमी दाबाने होतो आहे. यामुळे जळगावकर त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा… जळगाव महापालिकेचा जैववैद्यकीय कचरा प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी

आगामी काळात थेट महापालिका प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला. महानगराध्यक्ष मंगला पाटील यांनीही महापालिका प्रशासनावर आरोप केले. अशोक सोनवणे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष रमेश बार्हे, महानगराध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक आदी सहभागी होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar group staged a protest against the failure of the municipal corporation to provide civic amenities to citizens of jalgaon dvr