जळगाव – खरीप हंगामाची नवीन लागवड होत असताना शेतकर्याच्या कापसाला भाव मिळत नाही. अजूनही शेतकर्यांच्या घरात ३० ते ३५ टक्के कापूस घरातच कापूस पडून आहे. कष्टकरी शेतकर्यांच्या न्याय्यहक्कांसाठी राज्यातील कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल १२ हजारांसह शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून, बुधवारपासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मी शेतकरी लिहिलेली गांधी टोपी परिधान करीत आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा, जोपर्यंत शेतकर्यांच्या कापसाबाबत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीच सदस्य रवींद्र पाटील जामनेर तालुकाध्यक्ष संजय गरुड, प्रदीप लोढा, विलास राजपूत, विश्वजित पाटील, दत्ताभाऊ साबळे, रोहन राठोड, मोहन जोशी आदी सहभागी आहेत. विविध घोषणांनी परिसर दणाणला होता.
हेही वाचा >>>धुळे: भगवान पार्श्वनाथ मंदिरातील चोरी उघडकीस; चांदीचे मुकूट, सोन्याचे दागिने हस्तगत
उपोषणस्थळी नेते, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना पाटील, पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सहभाग नोंदवून सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. उपोषणार्थी रवींद्र पाटील म्हणाले की, जिल्ह्यात दोन मंत्री असूनही शेतकर्यांचे प्रश्न कायमच आहेत. शेतीमालाला भावच नाही. त्यात सोयाबीन, हरभरा, ज्वारी, बाजरी आदी धान्यांना हमीभाव नाही. जिल्ह्यात सर्वाधिक कापूस उत्पादन घेतले जाते. कापसाला सहा हजार ते साडेसहा हजारांचा भाव आहे. सध्या नवीन लागवड सुरू झाली आहे आणि जुनाच कापूस घरात पडून आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीतून उभा राहत खरीप हंगामासाठी पुन्हा जोशाने कष्ट उपसत आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकर्यांच्या प्रश्नासाठी याच ठिकाणी उपोषण आंदोलन केले होते. आता ते मंत्री असूनही शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाहीत, असा घणाघातही त्यांनी केला. जोपर्यंत कापसाला प्रतिक्विंटलला १२ हजारांपर्यंत भाव मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका पाटील यांनी घेतली आहे.