दुष्काळ आणि शेतकऱयांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाशिकमध्ये आंदोलनाचे नेतृत्त्व करताहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आग्रा हा राष्ट्रीय महामार्गही काहीवेळ रोखून धरला होता. धुळ्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड हे आंदोलनाचे नेतृत्त्व करीत आहेत.
त्याचबरोबर द्वारका, येवला येथील विंचूर चौफुली, नांदगाव येथे तहसिल कार्यालय, निफाड चौफुली, नाशिक तालुक्यातील पुणे महामार्ग शिंदे गाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्र्यंबक व हरसूल, इगतपुरी पंचायत समिती कार्यालय, सिन्नर बस स्थानक, कळवण बस स्थानक, दिंडोरी येथील पालखेड चौफुली, सुरगाणा येथील गुजरात महामार्गावरील बोरगाव, पेठ जुने बस स्थानक, चांदवड पंचायत समिती समोरील चौफुली, देवळा येथील पाचकंदील चौफुली, बागलाण तालुक्यातील सटाणा शहरातील चौफुली, मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथेही जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. नांदगावमध्ये पंकज भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात येते आहे.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱयांना त्वरित कर्जमाफी द्यावी, वीजबिल माफ करावे आणि तातडीने चाराछावण्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, कालपासून जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आले. सोमवारी जालन्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. औरंगाबादमध्ये दिलीप वळसे-पाटील, लातूरमध्ये जयंत पाटील, परभणीमध्ये धनंजय मुंडे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. दरम्यान, याच मुद्द्यावरून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दुपारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.