जळगाव : मुक्ताईनगर मतदार संघातील १६ मतदान केंद्रांवर संशयास्पद मतदान झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या (शरद पवार) पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मतमोजणीच्या फेरपडताळणीसाठी निवडणूक शाखेकडे अर्ज दाखल करुन त्यासाठीचे शुल्कही भरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुक्ताईनगर मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच समाज माध्यमात एक यादी फिरली होती. यादीत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विजयासाठी विशिष्ट आकडेवारी देण्यात आली होती. त्या यादीतील आकडे आणि प्रत्यक्ष निकालात तंतोतंत साम्य आढळून आले. हा प्रकार अत्यंत संशयास्पद असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. एखाद्या मतदान केंद्रासंदर्भात असे अचूक आकडे मिळणे केवळ योगायोग नसून, यामागे निश्चितच गैरप्रकार आहे. दोन दिवस आधी समाज माध्यमात आलेली यादी आणि प्रत्यक्ष निकाल यातील आकडे इतके जुळतील हे ज्योतिषीही सांगू शकणार नाही, असेही खडसे म्हणाल्या.

हेही वाचा…नाशिकमध्ये ४६१ उपद्रवींविरोधात कारवाई

काही गावांमध्ये जिथे विरोधक उमेदवाराला मते मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती, तिथे त्यांना अनपेक्षितरित्या जास्त मते मिळाली आहेत. ३० वर्षांपासून संबंधित गावांमध्ये आपल्या वडिलांना तसेच आपणास कधीही कमी मते मिळालेली नाहीत. यावेळी आम्हाला अपेक्षेपेक्षा खूप कमी मते मिळाली. हा लोकांचा कल नसून ईव्हीएमने निर्माण केलेला कल आहे, असा आरोपही खडसे यांनी केला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncps rohini khadse alleged 16 suspicious polling stations in muktainagar constituency sud 02