जळगाव – जिल्ह्यातील मुक्ताईनगरात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेले संशयित हे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) कार्यकर्ते असल्याचा आरोप होत असतानाच, जळगावमधील शिंदे गटाच्या महिला आघाडीने संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे संत मुक्ताई यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची टवाळखोरांनी छेड काढल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सात जणांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यातील चार संशयितांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांचा संबंध शिवसेनेशी (एकनाथ शिंदे) जोडला गेला. दुसरीकडे, मुक्ताईनगरातील शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः छेडछाड प्रकरणातील संशयित हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याची पुष्टी दिली.

दरम्यान, मुक्ताईनगरातील घटनेनंतर शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता माळी-कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची सोमवारी भेट घेतली. संशयितांविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शिवसेना हा महिलांच्या सुरक्षेसाठी ओळखला जाणारा पक्ष आहे. कुठलाही नेता आपल्या कार्यकर्त्यांना असे गैरकृत्य करण्यास प्रवृत्त करत नाही. अशा प्रकारच्या विकृतीला आमचा कोणताही पाठिंबा नाही. अनेक महिला व मुली छेडछाडीच्या घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत नाहीत. परंतु, मंत्री रक्षा खडसे यांनी धाडसाने पुढे येऊन तक्रार दाखल केली. याबाबत आम्ही त्यांचे कौतुक करतो. समाजातील अशा विकृतींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. यापूर्वी जळगावमध्ये महिला व मुलींची छेड काढणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्याच धर्तीवर मुक्ताईनगरमध्येही कठोर उपाययोजना करून संशयितांना धडा शिकवावा, अशी मागणी शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख संतोष पाटील व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Story img Loader