शासकीय परिचारिका महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थीचा मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थिनींनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केली. यावेळी पालकांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकरणी परस्परविरुध्द तक्रारीही पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांची उचलबांगडी करण्यात आली. शासकीय वा खासगी रुग्णालयांत रुग्णाचे नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यातील वादाच्या घटना सातत्याने समोर येतात. या पाश्र्वभूमीवर, आरोग्य भारती संस्थेचे सदस्य आयुर्वेद चिकित्सक वैद्य विजय कुलकर्णी यांनी मांडलेले मत..
डॉक्टर आणि रुग्णालये यांच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने होणारे हल्ले हा एकुणच सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनु पहात आहे. रुग्णालयात प्रविष्ट झालेल्या रुग्णाचा मृत्यू होणे हे या हल्ल्यांचे एक मोठे कारण दिसते. शासकीय तसेच खासगी अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयावर हे हल्ले होतात. प्रामुख्याने रुग्णालयांची तोडफोड तसेच तेथील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य सहकारी यांना शिवीगाळ आणि मारहाण असे काहिसे स्वरुप असते. तोडफोड किंवा मारहाण करणारे लोक हे रुग्णाचे नातेवाईक किंवा मित्रमंडळींपैकी असतात. रुग्णालयात प्रवेशित केलेल्या रुग्णाचा होणारा अनपेक्षित मृत्यू त्या रुग्णाच्या आप्तेष्टांना धक्का लावून जातो आणि डॉक्टरांच्या किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण मृत्यू पावला अशा समजापोटी अशी तीव्र प्रतिक्रिया उमटते. काहीवेळा डॉक्टरांनी आकारलेल्या बिलाच्या मोठय़ा रकमेमुळे असे हल्ले होताना दिसतात.
हे सगळे वास्तव चित्र आपण पहात असलो तरीही त्यावर डॉक्टर आणि रुग्ण या दोन्ही घटकांमध्ये सुसंवादाची नितांत गरज आहे हे विसरता कामा नये. आज हा सुसंवाद कमी होत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे. सामंजस्याने हा प्रश्न सुटू शकेल. अशा प्रकारचे सामाजिक प्रश्न केवळ कायदे करून सुटतातच असे नाही. डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र शासनाने कायदा करुनही हल्ले थांबलेले नाही याची समिक्षा होणे आवश्यक आहे. सर्व पॅथीच्या डॉक्टरांच्या संघटना, ग्राहक संघटना तसेच लोकप्रतिनिधी अशा काहिंनी एकत्र येऊन सामाजिक प्रबोधन करणे आवश्यक आहे. अशा होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भात नेमकी चूक कोणाची याचा उहापोह करण्यापेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रत्येक वेळी त्या रुग्णाची आरोग्याची नेमकी स्थिती काय आहे हे प्रामाणिकपणे समजून घ्यायला हवे आणि डॉक्टरांनी वेळ काढून ते समजून सांगायला हवे. यासाठी वेगवेगळ्या निमित्ताने आरोग्य जागृतीचे कार्यक्रम घडवून आणता येतील. डॉक्टर व रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यातील तेढ वाढू नये याची काळजी घेणे कोणा एका घटकाची जबाबदारी नसून वर सांगितलेल्या सर्व घटकांनी एकत्र येऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणे यातच सर्वाचे हित आहे.

Story img Loader