आयएमआरटी संस्थेतील कार्यशाळेत विकास नाईक यांचा सल्ला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. गुन्हेगार वेगवेगळ्या कल्पना वापरून आर्थिक, सामाजिक गुन्हे करत असतो. या एकंदर स्थितीत ऑनलाइन व्यवहार करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला शारदा इंटरप्रायजेसचे व्यवस्थापकीय संचालक विकास नाईक यांनी दिला आहे.

मविप्र शिक्षण संस्थेच्या आय.एम.आर.टी. व्यवस्थापनशास्त्र संस्थेच्या वतीने ‘सायबर सुरक्षा आणि हॅकिंग तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत नाईक यांनी मार्गदर्शन केले. आज सर्व जण शिक्षित झाले असले तरी सायबर सुरक्षेचे पालन करतोच असे नाही. आज बहुतांशी बँकांचे व्यवहार ऑनलाइन होत आहेत. सर्व जण समाजमाध्यमांवर सक्रिय असल्याने सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाणही वाढत आहे.

देशात आज ४९५ लाख लोक ऑनलाइन असून त्यातील जवळपास ८० टक्के लोकांनी एकदा तरी ऑनलाइन खरेदी केलेली आहे. त्या वेळी काय खबरदारी घ्यावी, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना काय गुन्हे होतात, खरे संकेतस्थळ कोणते हे कसे ओळखावे आदींबाबत त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. आयएमआरटीचे संचालक डॉ. डी. के. मुखेडकर यांनी सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. आज प्रत्येकाला सायबर सायबर सुरक्षा काय आहे हे माहीत असायला हवे. कारण ते ज्ञात नसल्यास नकळतपणे सायबर गुन्हादेखील घडू शकतो अथवा तशा प्रकारास बळी पडू शकतो. त्यामुळे सायबर सुरक्षेचे नियम सर्वाना माहिती असायला हवेत, असे मुखेडकर यांनी नमूद केले. सूत्रसंचालन श्यामली गरकल, नम्रता महाजन यांनी केले. कार्यशाळा संयोजन डॉ. एस. ए. गायकवाड, डॉ. व्ही. एन. भाबड, डॉ. डी. व्ही नांद्रे, बी. डी. इकडे, बी. जी. नाडे आदींनी केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to be careful about online transactions
Show comments