नीलेश पवार, लोकसत्ता
नंदुरबार: राज्यात कुपोषण आणि बालमृत्यू यात अग्रेसर तालुका असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगावात ५० लाख रुपये खर्च करुन खरेदी केलेली अत्याधुनिक नवजात शिशु रुग्णवाहिका १० महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. या रुग्णवाहिकेवर डॉक्टरची नियुक्ती झाली नसल्याने तसेच त्यातील यंत्रसामग्रीची जोडणी झाली नसल्याने यावर शासकीय अनास्थेची धूळ साचल्याचे चित्र आहे. कुपोषणामुळे कलंकित असलेल्या धडगाव तालुक्यातून जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित होणाऱ्या लहान मुलांची संख्या पाहता महाविकास आघाडी शासनाच्या कार्यकाळात धडगाव ग्रामीण रुग्णालयाला पुणे येथून अत्याधुनिक अशी सुमारे ५० लाख रुपयांची नवजात शिशू रुग्णवाहिका पाठविण्यात आली होती.
ऑगस्ट २०२२ मध्ये धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेली ही रुग्णवाहिका तेव्हांपासून धूळ खात पडून आहे. तोरणमाळ येथे यंत्रसामग्री जोडण्यासाठी रुग्णवाहिका नेण्यात आली असता कर्मचाऱ्यांवर पर्यटनासाठी नेल्याचा आरोप झाला. हे प्रकरण थेट विधानसभेत पोहचल्याने यानंतर या रुग्णवाहिकेला कोणीही हात लावलेला नाही. रुग्णवाहिकेत काचेची पेटी स्ट्रेचरवर जोडण्यात आली असून शिशूला उपचारासाठी याच पेटीतून गरज भासल्यास अन्य ठिकाणी नेण्याची सुविधा आहे. १० महिन्यात या रुग्णवाहिकेसाठी दोन चालक आणि एका डॉक्टरची नियुक्ती आवश्यक होती. दोन चालकांची मे महिन्यात नियुक्ती झाली असली तरी डॉक्टर नियुक्तीची प्रतिक्षा कायम आहे. दुसरीकडे रुग्णवाहिकेतील काचेच्या पेटीला प्राणवायू सिलेंडरची जोडणी आणि अन्य गोष्टींची जोडणी होणेदेखील बाकी आहे. त्यामुळे शासनाने घेतलेली ही रुग्णवाहिका फक्त ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी की नवजात शिशुंचे प्राण वाचविण्यासाठी, असाच काहीसा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी वाचा-पालकमंत्री, पदाधिकाऱ्यांसमोरच शिंदे गटातील महिलांचे भांडण; पोलीस ठाण्यातच समर्थकांमध्ये हाणामारी
नवजात शिशू रुग्णवाहिकेत सामग्रीची जोडणी बाकी असल्याने तिचा वापर करु शकत नाही. त्यावरील दोन चालक देखील प्राप्त झाले आहेत. -डॉ. वानखेडे (वैद्यकीय अधिक्षक, धडगाव ग्रामीण रुग्णालय)
नंदुरबार जिल्हा राज्यात कुपोषण आणि बालमृत्यूसाठी प्रसिध्द आहे. अशातच नवजात शिशु रुग्णवाहिकेवर डॉक्टरांची नियुक्ती न होणे, तिचा साधा संदर्भयुक्त रुग्णांसाठीही वापर न होणे, हे गंभीर चित्र असून यातून बालमृत्यू आणि मातामृत्यू सारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे असे म्हणायला हरकत नाही. -लतिका राजपूत (सामाजिक कार्यकर्त्या, नर्मदा बचाव आंदोलन)