नाशिक : नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस नदीत कोसळल्याने जळगाव जिल्ह्यातील २७ जणांचा मृत्यू झाला, तर १५ गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात झाला. पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस मर्स्यांगडी नदीत कोसळली.
भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील ११० भाविक देवदर्शनासाठी १५ ऑगस्टला रवाना झाले होते. भाविक उत्तर प्रदेशातील प्रयागराजपर्यंत रेल्वेने गेल्यानंतर तेथून त्यांनी नेपाळमध्ये जाण्यासाठी गोरखपूरच्या केसरवानी टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या तीन खासगी बसेसची नोंदणी केली होती. एक बस पर्यटकांना घेऊन पोखराकडून काठमांडूकडे जात असताना नियंत्रण सुटल्याने मर्स्यांगडी नदीत कोसळली. अपघातात चालक आणि वाहकांसह २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. बस जिथे पडली, ते ठिकाण डोंगराच्या खाली असल्याने बचावकार्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा…करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य
गोरखपूर येथील केसरवानी टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सचे मालक विष्णू केसरवानी यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या तीन बस गोरखपूरहून नेपाळला गेल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील बरेच पर्यटक होते. पर्यटकांना प्रयागराजहून आणले होते. तेथून चित्रकूट, अयोध्या आणि त्यानंतर गोरखपूरमार्गे सुनौली, लुंबिनी आणि पोखराला बस गेल्या. तिन्ही बस पोखराहून काठमांडूकडे जात असताना मुगलिंगजवळ एक बस नदीत कोसळली. बसचालकाचे दोन्ही भ्रमणध्वनी बंद झाल्याने अपघातात चालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता केसरवानी यांनी वर्तविली.
हेही वाचा…नाशिक : गर्दी जमविण्यात प्रशासनाला यश
यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मदतकार्याबाबत सूचना केल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही उत्तर प्रदेश आणि नेपाळ प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले.
२४ मृतांची नावे
मृतांपैकी काही जणांची ओळख पटली असून त्यात १) रणजित मुन्ना-वाहक, २) मुस्तफा मुर्तझा, ३) सरला राणे, ४) भारती जावळे, ५) तुळशीराम तायडे, ६) सरला तायडे, ७) संदीप सरोदे, ८) पल्लवी सरोदे, ९) अनुप सरोदे, १०) गणेश भारंबे, ११)नीलिमा धांडे, १२) पंकज भंगाळे, १३) परी भारंबे, १४) अनिता पाटील, १५) विजया जावळे, १६) रोहिणी जावळे, १७) प्रकाश कोळी, १८) सुधाकर जावळे, १९) सुलभा भारंबे, २०) सुभाष रडे, २१) सुहास राणे, २२) लीला भारंबे, २३) रिंकी राणे, २४) नीलिमा जावळे यांचा समावेश आहे.