नाशिक : नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने १४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १६ पर्यटक गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये काही जण जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात नर्स्यांगडी अंबुखैरनीजवळ घडला. भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळली.
भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील ११० भाविक नेपाळ दर्शनासाठी १५ ऑगस्टला रवाना झाले होते. पर्यटक प्रयागराजपर्यंत रेल्वेने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या खासगी बससेवेची नोंदणी केली होती. एक बस पर्यटकांना घेऊन पोखराकडून काठमांडू येथे जात असताना नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली. अपघातात चालक आणि वाहकांसह १४ पर्यटकांचा मृत्यू झाला. बस जिथे पडली, ते ठिकाण डोंगराच्या खाली असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. मृतांमध्ये काही जण जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यात १० हजारहून अधिक नवउद्योजक
दरम्यान, नेपाळमधील अपघाताबाबत मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी उत्तर प्रदेशच्या नेत्यांबरोबरही चर्चा केल्याचे सांगितले. बसमध्ये ४१ पर्यटक होते. त्यातील १४ जण मृत्युमुखी पडले आहेत. नेपाळच्या सशस्त्र दल व लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे, तसेच दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप फारशी माहिती मिळालेली नसल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा…नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल
यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी तातडीने माहिती घेऊन मदतकार्याबाबत सूचना केल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपघाताबाबत माहिती घेतली जात असून, उत्तर प्रदेश व नेपाळ प्रशासनाशी संपर्क साधला असल्याचे सांगितले.