चिता हेलिकॉप्टरला नव्या इंजिनाचा साज; अपघात टाळण्यासाठी बदल
भारतीय लष्करात तब्बल पाच दशकांपासून सेवा देणाऱ्या चिता हेलिकॉप्टरचे अपघात रोखण्यासाठी अखेर त्यांचे कालबा ठरलेले इंजिन बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) बंगळुरूतील हेलिकॉप्टर विभागात हे काम प्रगतीपथावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या इंजिनमुळे या हेलिकॉप्टरला अधिक शक्ती प्राप्त होईल, शिवाय वैमानिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल. या बदलांच्या माध्यमातून ‘चिता’ हेलिकॉप्टर ‘चितल’ या नावाने ओळखले जाणार आहे.
लष्कराकडील चिता व चेतकचे अलीकडच्या दीड वर्षांचा अपवाद सोडल्यास वर्षांगणिक दोन ते तीन अपघात झाले आहेत. त्यात वैमानिकांसह अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले. ही दोन्ही हेलिकॉप्टर ४० ते ५० वर्षे जुनी आहेत. त्यांचे आयुर्मान कधीच संपुष्टात आले आहे. नवीन खरेदी होत नसल्याने लष्कराला त्यांचा वापर करणे क्रमप्राप्त ठरले. सीमावर्ती भागात दळणवळण, पुरवठा व्यवस्था व टेहेळणी आदी जबाबदारी या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सांभाळली जाते. अपघातांच्या फेऱ्यात सापडलेल्या चिता व चेतकची जागा आगामी काळात रशियन बनावटीच्या ‘कामाव्ह २२६’ हेलिकॉप्टरला देण्यात येणार आहे. सुखोई लढाऊ विमानाच्या धर्तीवर वजनाने हलकी असणारी ही हेलिकॉप्टर ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत देशातच उत्पादित करण्यात येतील. जुनाट चिता व चेतक हेलिकॉप्टर तातडीने बदलावीत, यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींचा गट आग्रही आहे. नवीन हेलिकॉप्टरच्या देशांतर्गत उत्पादनाचा विषय प्रगतिपथावर असला तरी प्रत्यक्ष ती लष्करात समाविष्ट होण्यास काही वर्षांचा कालावधी जाईल. तोपर्यंत संपूर्ण मदार चिता व चेतकवरच राहणार आहे. सद्य:स्थितीत लष्कराच्या ताफ्यात सुमारे २०० चिता व चेतक हेलिकॉप्टर आहेत.
त्यांच्या इंजिनची कित्येकदा संपूर्ण दुरुस्ती केली गेली. त्यांचे सुटे भाग मिळणे जिकिरीचे ठरले होते. या एकंदर स्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संरक्षण मंत्रालयाने पाच दशकात प्रथमच अति उंच सीमावर्ती भागात वापरल्या जाणाऱ्या ‘चिता’चे कालबाह्य़ झालेले इंजिन बदलत नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला.
जुन्या इंजिनच्या तुलनेत नवीन इंजिन शक्तिशाली आहे. आधुनिक दिशादर्शक यंत्रणा, संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा आदींचा त्यात समावेश आहे. अतिशय कमी जागेत असणाऱ्या तळावरही ‘चितल’चा वापर करता येईल. – लष्करी अधिकाऱ्याने दिलेली माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा