शालेय स्तरावरील अभिनव उपक्रम;  महिनाभरात ९० सभासद

नाशिक : समाज माध्यमांमुळे वाचन संस्कृती लोप पावत असल्याची तक्रार वारंवार होत असतांना याच माध्यमांचा वापर करीत येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये कार्यरत वाचनवेडय़ाने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत ‘ई बुक’ ग्रंथालय संकल्पनेला मूर्त रूप दिले. अवघ्या महिन्याभरात या ग्रंथालयाची ९० हून अधिक वाचक सभासद संख्या झाली आहे.

नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे ग्रंथपाल विलास सोनार यांची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. जिल्ह्य़ात पहिल्यांदाच शालेय स्तरावर असा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. वेळेअभावी कमी होत जाणारे वाचन आणि माध्यमांची वाढती आवड याचा ताळमेळ बसवितांना हा उपक्रम आकारास आला आहे.  हा उपक्रम शालेय स्तरापुरता मर्यादित न राहता संस्था पातळीवर सक्रिय झाला आहे. संस्थेच्या विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सोनार यांनी या उपक्रमाची माहिती देत त्याची जोडणीपाठविली. ज्यांना या समूहात सहभागी व्हायचे, ते यात सहभागी झाले. हा आकडा सध्या ९३ च्या घरात आहे.

भ्रमणध्वनी हातात असेल आणि फावला वेळ असेल किंवा अन्य काही कामे करता करता ही पुस्तके एकाच वेळी कुटुंबातील अन्य सदस्यही ऐकू शकत असल्याने दिवसागणिक वाचक संख्या वाढत आहे. शिवाय या पुस्तकातील फॉण्टचा आकारही वाढविता येतो, अशा विविध वैशिष्टय़ांमुळे वाचकांकडून वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांची मागणी होत असल्याचे सोनार यांनी सांगितले.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक यांच्या नंतर हा उपक्रम आता पालकांपर्यंत पोहचावा, विद्यार्थ्यांनाही वाचनाची गोडी लागावी यासाठी शाळेच्या संकेतस्थळावरून पालकांसाठी हे ग्रंथालय लवकरच सुरू होणार असल्याचे सोनार यांनी सांगितले.

ग्रंथालयात १६०० हून अधिक पुस्तके

ई-बुक ग्रंथालयात १६०० हून अधिक पुस्तके असून ते वाचण्यासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागत नाही. ई-बुक्स, ध्वनिमुद्रित पुस्तके, मासिके, वेगवेगळ्या विषयावरील लेखांना मिळणारा प्रतिसाद पाहता दिवाळी अंकांची माहितीही देण्यात आली. सध्या पुलंचे असा मी असामी, वपुंचे कथाकथन देण्यात येत आहे. दररोज एखादी कथा, लघुकथा, कांदबरी, शोधनिबंध, इतकेच काय पाककृती अशा विविध प्रकारातील विषयाशी संबंधित माहिती टाकली जाते. महिन्यातून दोनदा या ग्रुपवर वाचकांकडून काही सूचना मागविण्यात येतात. यामध्ये कधी पीडीएफ पुस्तक तर कधी ध्वनिमुद्रित पुस्तकाची माहिती दिली जाते. यामुळे या उपक्रमास प्रतिसाद लाभत आहे.

Story img Loader