उद्योग, निर्यातदार संघटनेच्या चर्चासत्रात मान्यवरांचे मत
नवीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) धोरण २०१५ मध्ये अनेक योजनांचा समावेश असून या धोरणाचा उपयोग या क्षेत्रातील उद्योग वाढीसाठी नाशिकला होणार असल्याचा सूर मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि नाशिक जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटना यांच्यातर्फे आयोजित चर्चासत्रातून निघाला.
शहरात माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी उद्योगाविषयी उत्सुकता असली तरी या उद्योगांसंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. अशा मार्गदर्शनाअभावी शहरात आयटी उद्योग फारसा बहरू शकला नसल्याची परिस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य शासनातर्फे अलिकडेच जाहीर करण्यात आलेले ‘आयटी धोरण २०१५’ नाशिकसाठीही सहाय्यभूत होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आयटी धोरणातंर्गत उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र, मुद्रांक शुल्कात सवलत, वीज दरात सवलत व अनुदान, मालमत्ता कर रहिवासी दराने, प्रवेश कर माफी, मूल्यवर्धित कराच्या दरात सवलत, अशा अनेक योजना घोषित करण्यात आलेल्या आहेत. यासंबंधी नाशिकचे उद्योग सहसंचालक बळवंत जोशी यांनी माहिती दिली.
नाशिकमधील आयटी उद्योगांनी जिल्हा उद्योग केंद्रात नोंदणी करून नवीन आयटी धोरणातील योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जोशी यांनी केले आहे. बीएसएनएल नाशिकचे महाप्रबंधक सुरेश प्रजापती यांनी इंटरनेट सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रताप मोहंती यांनी आयटी उद्योजकांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. बँकेतर्फे लवकरच आयात-निर्यातदारांची बैठक घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. नाशिक जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष रमेश पवार यांनी चर्चासत्रात होणाऱ्या मार्गदर्शनाचा आयटी उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. नाशिकच्या आयटी उद्योगासाठी अशी चर्चासत्रे, बैठका, सतत आयोजित करण्यात येतील. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात मंदी असल्याने उद्योजकांनी आयटी तज्ज्ञांच्या सहकार्याने या क्षेत्रात प्रवेश करण्याचा सल्लाही पवार यांनी दिला. अंबडमध्ये आयटी उद्योग वाढीस मोठा वाव आहे. अंबड येथील एमआयडीसीतील आयटी पार्क इमारत मिळण्यासाठी उद्योजकांचा आग्रह असून त्यासंदर्भातील मागणी पत्रे एमआयडीसीला सादर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यानी विद्यार्थी व उद्योजकांना आयटी धोरणामुळे आयटी उद्योगाला नवीन चालना मिळेल तसेच या क्षेत्रातील मोठे उद्योग नाशिक येथे सुरू होतील, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी युगंधर पगार या विद्यार्थ्यांचा आयटी कंपनी सुरू करून मोठय़ा प्रमाणात व्यवसाय वाढविल्याबद्दल उद्योग सहसंचालक जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी झालेल्या चर्चेत धनंजय बेळे, शशांक तोडवाल, अनिल गिते, आदींनी भाग घेतला. वसंत शेगावकर यांनी आभार मानले.
नवीन आयटी धोरण उद्योगांसाठी पूरक
नवीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) धोरण २०१५ मध्ये अनेक योजनांचा समावेश असून या धोरणाचा उपयोग या क्षेत्रातील उद्योग वाढीसाठी नाशिकला होणार
Written by चैताली गुरवguravchaitali
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-10-2015 at 07:46 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New it policy is ancillary for the industry