लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेरचा जुळा भाऊ म्हटल्या जाणाऱ्या बागलाण तालुक्यातील सालोटा किल्लावर जाण्यासाठी अपरिचित असलेली दुसरी वाट शोधण्यात आली आहे. नाशिक येथील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या पथकाने हा दावा केला आहे.

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने महाराष्ट्रातील गिर्यारोहकांना, डोंगर भटक्यांना सह्याद्रीच्या वाटा धुंडाळण्याचे आवाहन केले होते. वैनतेयच्या पथकाने १३ आणि १४ डिसेंबर या दोन दिवसांच्या मोहिमेत सालोट्यावर चढाईसाठी नवीन वाट शोधून काढली. सद्यस्थितीत ही वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. सुमारे ४० पायऱ्या असून एका बाजूला कातळ तर, दुसऱ्या बाजूला दरी, अशी ही वाट धोकादायक स्थितीत आहे.

आणखी वाचा-पैसे तिप्पट करण्याच्या बहाण्याने पोलिसांकडूनच फसवणूक

सालोट्याच्या विस्तीर्ण अशा माचीवर मध्यम श्रेणीची चढण चढल्यानंतर वरच्या टप्प्यातील चढण अवघड होते. तिथून पायऱ्यांचा टप्पा सुरू होतो. गडाच्या दक्षिण टोकाला असलेल्या बुरूजापर्यंतच ही वाट जाते. शोध मोहिमेच्या पहिल्या दिवशी वैनतेयच्या दोन गिर्यारोहकांनी पाठीवरचे अवजड सामान खाली ठेवून वाट चढून पाहिली. पायऱ्यांचा मार्ग अत्यंत धोकादायक असून पायऱ्यांवर पूर्णपणे माती असून त्यावर गवत उगवले आहे. काही पायऱ्या तुटलेल्या आहेत. इथून वर गेल्यानंतर बुरूजाच्या खाली वाट संपून गेल्याने पहिल्या दिवसाची मोहीम तिथेच थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुसऱ्या दिवशी पथकाने नेहमीच्या वाटेने किल्ल्यावर जाऊन वरच्या बाजूने प्रस्तरावरोहण करून खाली येण्याचा निर्णय घेतला. बुरूजाजवळील मोठ्या दगडाला दोर बांधून त्याच्या मदतीने तटभिंतीचा खालचा टप्पा गाठला. या ठिकाणी एक चौकोनी चिऱ्यांचा अद्याप उभा असलेला लहान दरवाजा दिसला. आदल्या दिवशी खालून वर येत चढून पाहिलेल्या पायऱ्यांचा टप्पा येथे संपल्याचे आढळले. त्या ठिकाणी सरळ एक तटभिंत लागते. या तट भिंतीच्या दुतर्फा घसाऱ्याची अवघड वाट असून त्या वाटेने मुक्तपणे चढणे धोकादायक असल्याचे आढळले.

आणखी वाचा-‘फडणवीस यांच्या आग्रहानंतरही पक्षाकडून दुर्लक्ष’

शोध मोहिमेत अनेकांचे सहकार्य

या मोहिमेचे नेतृत्व संस्थेचे दुर्ग अभ्यासक प्रशांत परदेशी यांनी केले. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य तथा विश्वस्त राहुल सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तांत्रिक आरोहणाची जबाबदारी गिर्यारोहक गौरव जाधव याने पार पाडली, त्यास चेतन खर्डे, देवसेना अहिरे यांचे सहाय्य लाभले. छायाचित्रण ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले. महारदरवाडी येथील भाऊदास पवार यांनी यापूर्वी ही वाट पाहिली होती. काही वर्षांपूर्वी ते ती चढून गेले होते. शोध मोहिमेत भाऊदास आणि नीलेश पवार यांचे सहकार्य लाभले.

काळाच्या गर्तेत हरवलेली एक वाट शोधणे, सह्याद्रीतील अजोड अलौकिक अशा दुर्गसंपदेची गुणवैशिष्ट्ये मांडण्याचा प्रयत्न करणे, या एकमात्र उद्देशाने वैनतेयच्या पथकाने ही मोहीम हाती घेतली होती. -प्रशांत परदेशी ( मोहीम प्रमुख, वैनतेय गिरीभ्रमण गिर्यारोहण संस्था,नाशिक)

Story img Loader