लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : ओझरस्थित नाशिक विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने घेतला आहे. या धावपट्टीसाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, विमानतळाच्या विकासाला गती मिळून हवाई वाहतुकीसाठी मोठी संधी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

‘इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर’ अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी माजीमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पडताळणी सुविधेसाठी एचएएलला मान्यता दिली आहे. यामुळे भविष्यात नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरू करणे शक्य होईल. एचएएलच्या संचालक मंडळाने नव्या धावपट्टीच्या निर्मितीसाठी २०० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली. नवीन धावपट्टीचे आरेखन व इतर तांत्रिक बाबींसाठी एचएएलकडून सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडू तांत्रिक सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर धावपट्टी तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण होताच ही धावपट्टी तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाईल, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

दोन वर्षांचा कालावधी

नव्या धावपट्टीचे काम पूर्ण होण्यास साधारणतः दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. ती सध्याच्या धावपट्टीप्रमाणेच तीन किलोमीटर लांब आणि ४५ मीटर रुंद असणार आहे. २०२२ साली धावपट्टीची डागडुजी सुरू असताना तब्बल १४ दिवस नाशिकचे विमानतळ ठप्प पडले होते, नवीन धावपट्टीच्या निर्मितीनंतर डागडुजी सुरू असतानाही विमानतळ सक्रिय ठेवणे शक्य होणार आहे.