महापालिकेचा १८९५ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर

सर्व विभागात नाटय़गृह, मायको सर्कल आणि रविवार कारंजा येथे उड्डाण पूल, गोदावरी नदीवर दोन पूल, पंचवटीत महिलांसाठी उद्योग भवन, त्र्यंबक नाका ते एबीबी सर्कलपर्यंत स्मार्ट रस्ता, क्रीडांगणांचा विकास, मोहल्ला क्लिनिक, वैद्यकीय ३२१ चाचण्या स्वस्त दरात करण्याची सुविधा अशा अनेक योजनांचा अंतर्भाव असणारा आणि कोणतीही करवाढ न सुचविणारा २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी १८९४.५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्थायी समितीला सादर केला.

नियमानुसार दोन टक्के मिळणाऱ्या नगरसेवक निधीवर सदस्य नाराज होते. लहानसहान कामे करता येत नसल्याची तक्रार त्यांच्याकडून सातत्याने केली जात होती. संबंधितांना नगरसेवक निधीतून साडेनऊ, तर प्रभाग विकास निधीतून प्रत्येकी ३० अशा एकूण प्रत्येकी ३९ लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती डॉ. हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयुक्तांनी हा अर्थसंकल्प सादर केला.

जीएसटी अनुदान, मालमत्ता कर, नगररचना शुल्क आणि पाणीपट्टी हे पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. आगामी वर्षांत वस्तू सेवा कराच्या अनुदानापोटी १००७ कोटी, मालमत्ता करापोटी २१८, नगर नियोजन विकास शुल्क २०२ कोटी, मिळकत, नगर नियोजन शुल्क, आरोग्य आदीतून २९, अनुदाने १६, परिवहन सेवा उत्पन्नातून १० कोटी आदी उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. चटई क्षेत्र निर्देशांकाचे उल्लंघन झालेल्या, भोगवटा दाखल्यापासून वंचित असणाऱ्या इमारतींना हार्डशिप दंड आकारून भोगवटा दाखला दिल्यास यातून १०० कोटीचे उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुख्य रस्ते, स्मशानभूमी सुधारणा, पूल, सांडवे बांधणी, क्रीडांगण विकसन आदी कामांकरिता सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ३०५ कोटींची तरतूद करण्यात आली. त्यात अपंगांसाठी प्रशिक्षण केंद्र, सायकल ट्रॅक विकसन, जॉगिंग ट्रॅकमध्ये सुधारणा आदींचा अंतर्भाव आहे. नाशिकरोड येथे सव्‍‌र्हे क्रमांक ११७ येथे नाटय़गृह बांधण्याचे काम सुरू केले जाणार आहे. पंचवटी आणि गंगापूर रोड येथे नाटय़गृह बांधण्याचे प्रस्तावित आहे. वाहनतळाची समस्या दूर करण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर ३४ ठिकाणी समांतर वाहनतळ, तर सात

भूखंडांवर स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. पंचवटीत महिलांसाठी ५२६० चौरस मीटर जागेत उद्योग भवन प्रस्तावित करण्यात आले आहे.

पाणीपुरवठय़ाच्या कामासाठी या वर्षांत ८५.३७ कोटींची तरतूद करण्यात आली असून पुढील काही दिवसात मुकणे धरणातून पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक पूर्व, पंचवटी, नवीन नाशिकमधील इंदिरानगर, वासननगर, चेतनानगर, दीपालीनगर भागात पाणी पुरवठय़ात सुधारणा होईल. गावठाण भागात नवीन जलकुंभ बांधून २४ बाय सात याप्रमाणे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्र्यंबक नाका ते जलतरण तलावपर्यंतचा रस्ता स्मार्ट करण्याचे आधीच निश्चित झाले आहे. हा मार्ग पुढे एबीबी चौकापर्यंत स्मार्ट करण्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या वर्षांत भांडवली कामांसाठी ८२१ कोटी रुपये उपलब्ध राहतील. पालिकेवर सुमारे ३०० कोटींचे दायित्व आहे. नवीन करवाढ प्रस्तावित करण्यात आली नसल्याचे गमे यांनी सांगितले.

ठळक वैशिष्टय़े

*    नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर रोड येथे नाटय़गृह

*   मायको सर्कल, रविवार कारंजा येथे उड्डाणपूल

*   गोदावरी नदीवर तांबट घाट, सुला वाइन चौकापासून नागरे नर्सरी येथे पूल

*   पंचवटीत महिलांसाठी उद्योग भवन

*   अल्प दरात ३२१ वैद्यकीय चाचण्यांची व्यवस्था

*   २५ मोहल्ला क्लिनिक, १० शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

*   जेडीसी बिटको रुग्णालयात वैद्यकीय पदविका अभ्यासक्रम

*   पूर्व विभागात अपंगांसाठी प्रशिक्षण केंद्र