सुखोई विमानांच्या सखोल दुरुस्तीसाठी (ओव्हरऑल) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची (एचएएल) क्षमता अपुरी पडत असल्याने आता हवाई दलाच्या येथील ११ देखभाल व दुरुस्ती केंद्रात नव्याने स्वतंत्र व्यवस्था उभारली जात आहे. या केंद्रात रशियन बनावटीच्या मिग श्रेणीतील विमानांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम चालते. सुखोईची व्यवस्था कार्यान्वित झाल्यानंतर एचएएलचा भार काहीसा हलका होईल. या व्यवस्थेमुळे स्थानिक उद्योगांना सुखोईशी संबंधित सुटय़ा भागांची निर्मिती आणि पुरवठा करण्याची नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
लढाऊ विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी भारताने रशियाकडून प्रथम ५० सुखोई खरेदी केले. तसेच तंत्रज्ञान हस्तांतरण कराराच्या माध्यमातून आणखी १८० विमानांची देशांतर्गत म्हणजे एचएएलमध्ये बांधणी केली जात आहे. हा टप्पा पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. हवाई दलाच्या ताफ्यात सुखोईंची संख्या मोठी आहे. दहा वर्षे कार्यरत राहिलेल्या विमानांची सुरक्षिततेसाठी संपूर्ण दुरुस्ती बंधनकारक ठरते. त्यासाठी या विमानांची बांधणी करणाऱ्या एचएएल या ओझरस्थित कारखान्यात आधीच व्यवस्था अस्तित्वात आहे. बांधणीच्या तुलनेत दुरुस्तीचे हे काम क्लिष्ट असते.
विशिष्ट हवाई तासांचे उड्डाण झाल्यानंतर विमानाचे सर्व भाग पूर्णपणे विलग केले जातात. प्रत्येक सुटय़ा भागाची तपासणी केली जाते. त्यांची झीज, यंत्रणांमधील दोष यावर संशोधन होते. प्रयोगशाळेत सखोल छाननीच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडते. त्यात सदोष सुटे भाग काढून त्यांच्या जागी पूर्णपणे नवीन भाग बसविले जातात. एका विमानाच्या ओव्हरऑलसाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो.
या सखोल दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी आणि विमानांची मोठी संख्या यांचा ताळमेळ एचएएलमधील व्यवस्थेमार्फत बसणे अवघड आहे. यामुळे एचएएललगतच कार्यान्वित असणाऱ्या हवाई दलाच्या ११ देखभाल व दुरुस्ती केंद्रात सुखोईच्या ‘ओव्हरऑल’साठी नव्याने व्यवस्था उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
हवाई दलाच्या देशातील देखभाल व दुरुस्ती केंद्रांत आघाडीवर असणाऱ्या या केंद्राकडे रशियन बनावटीच्या मिग २१, मिग २३, मिग २७ आणि मिग २९ या लढाऊ विमानांच्या दुरुस्तीचा चार दशकांचा अनुभव आहे. या आधारे अत्याधुनिक सुखोई विमानाच्या संपूर्ण दुरुस्तीचे काम लवकरच केंद्रात सुरू होत असल्याचे केंद्राचे प्रमुख कॅप्टन पी. के. आनंद यांनी सांगितले.
सुखोईच्या दुरुस्तीचे ज्ञान मागील काही वर्षांत रशियाकडून भारतीय तंत्रज्ञांनी आत्मसात केले आहे. रशियातील हवामान लक्षात घेऊन तेथील कारखाने लढाऊ विमानांची निर्मिती करतात. भारतात ही विमाने वाळवंटासारख्या उष्ण प्रदेशापासून ते हिमालयातील उणे अंशापर्यंतच्या हवामानात कार्यरत राहतात. दोन्ही देशांतील हवामानात विलक्षण फरक असल्याने देखभाल करताना काही बदल करणे क्रमप्राप्त ठरते, याकडे आनंद यांनी लक्ष वेधले.