‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीनुसार मदर इंडिया क्रोकेट क्वीन (एमआयसीक्यू) संस्थेने अनोखा विश्वविक्रम करण्याचा संकल्प सोडला आहे. एमआयसीक्यू ५००० चौरस मीटर लोकरी ब्लँकेट तयार करण्याच्या तयारीत आहे. या आधी दक्षिण अफ्रिकेच्या महिलांनी तीन हजार चौरस मीटर आकाराचे लोकरी ब्लँकेट तयार केले होते. जानेवारी २०१६ मध्ये या प्रकल्पाला मूर्त स्वरूप येणार असल्याची माहिती प्रकल्प समन्वक श्रेया पादे यांनी दिली. त्या अंतर्गत नाशिकमध्येही काम सुरू करण्यात आले.
दक्षिण अफ्रिका येथील महिलांनी एकत्र येत २०१५ मध्ये ३३७७ चौरस मीटर लांबीचे ब्लँकेट तयार केले. त्यांचा हा विक्रम मोडीत काढण्यासाठी ‘एमआयसीक्यू’च्या सदस्यांनी एकत्र येत चेन्नई येथील शुभश्री नटराजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प केला. यासाठी संस्थेच्या एक हजाराहून अधिक महिला एकत्रित आल्या असून देशासह परदेशातही यासाठी काम सुरू आहे. कामात एकसंधता यावी यासाठी विविध रंगसंगतीत ४ प्लाय यार्न आणि ५ एमएम क्रोक्रेट हुकचा वापर करून हे भव्य स्वरूपातील क्रोसिया कामाताली लोकरीचे ब्लँकेट तयार होणार आहे. मात्र एकाच ठिकाणी हे काम होणार नसल्याने संस्था विविध शाखांमध्ये तुकडय़ाच्या स्वरूपात हे काम करत आहे. राज्याचा विचार केला तर मुंबई, नागपूर, नाशिकसह अन्य शहरातील महिलांनी त्यात सहभाग नोंदविला. नाशिक येथील गोदातिरी बुधवारी त्या अनुषंगाने काम करण्यात आले. त्यात नाशिकच्या अरुणा होसमणी-क्षत्रिय, मंजूषा घाटे यांनी सहभाग घेतला. त्यांना ठाणे येथील मेधा पाडे, आशा बोंडे यांनी मदत केली. हा उपक्रम जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. जानेवारी अखेरीस विणलेली मोठी वस्त्रे चेन्नईच्या संस्था कार्यालयात एकत्र करत त्यांची एकत्रित जोडणी करण्यात येणार आहे. जोडणीतून तयार झालेले लोकरी ब्लँकेटची पाहणी गिनीज बुकचे पॅनल करणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा