मोफत भ्रमणध्वनी-टॅब देऊन ई-साक्षरता

नवमाध्यमांचे वारे सर्वत्र वाहत असताना ग्रामीण भाग तुलनेत काहीसा मागास राहिला. या पाश्र्वभूमीवर, टाटा सामाजिक संस्था व महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) एक पाऊल पुढे टाकत ग्रामीण भागातील महिलांसाठी ई साक्षरता वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी ‘इंटरनेट साथी’ या खास कार्यक्रमाची आखणी झाली. माविमच्या चांदवड आणि सुरगाणा या तालुक्यात सुरू झालेल्या वर्गात ६२ महिलांनी सहभागी होत अत्याधुनिक भ्रमणध्वनी व टॅबच्या साहाय्याने आपला अभ्यास सुरू केला. विशेष म्हणजे, माविम व टाटाने महिलांना ई-साक्षरतेसाठी गरजेचा टॅब व भ्रमणध्वनी मोफत स्वरूपात उपलब्ध केला आहे.

महामंडळाने टाटा सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ग्रामीण भागातील महिलांच्या डिजिटल साक्षरतेसाठी ‘इंटरनेट साथी’ उपक्रमाची आखणी केली. यासाठी माविमचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक, निफाड, चांदवड, मालेगाव, कळवण, अभोणा आणि सुरगाणा या लोकसंचालित साधन केंद्रांची निवड केली. नाशिक माविमचे मुख्य अधिकारी अशोक चव्हाण व साहाय्यक सहनियंत्रण अधिकारी जगन्नाथ वानखेडकर यांच्या मार्गदर्शनाने कामास सुरुवात झाली. प्रत्येक साधन केद्रांत साधारणत: दोन ते तीन हजार महिला बचत गटामार्फत काम करत आहेत. यातून ‘इंटरनेट साथी’ या समन्वयिकेची निवड करण्यात आली. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्पात चांदवडमधील ३० आणि सुरगाणा येथील ३२ महिलांनी सहभाग घेतला. याद्वारे जिल्ह्यातील २४७ गावे या उपक्रमात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभागी झाले आहेत. ही निवड करताना महिलांचे शिक्षण, त्यांची भ्रमणध्वनी वापरायची सवय, टेक्नोसॅव्ही आहेत का हे मुद्दे लक्षात घेण्यात आले. प्रशिक्षणात भ्रमणध्वनी तसेच टॅब कसा हाताळायचा, त्यावर तापमान, सरकारी, सामाजिक, आर्थिक, कृषी, उद्योग, महिला यासह अन्य काही महत्त्वपूर्ण योजनांची माहिती कशी शोधायची, बचत गटाच्या माध्यमातून लघू उद्योग सुरू  असेल तर बाजारपेठेत तत्सम कोणते उद्योग त्याच धर्तीवर सुरू आहेत, त्याची उलाढाल, यानुसार आपल्या व्यवसायात अपेक्षित बदल, महिलांना आरोग्यविषयक येणाऱ्या अडचणी, महिलांसाठी असणाऱ्या सुरक्षा योजना यासह अन्य काही मुद्दय़ांवर प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.  या महिलांना कामासाठी प्रति महिना १२०० रुपये मानधन देण्यात येणार असून पुढील आठ महिने हा उपक्रम जिल्ह्यात सुरू राहणार आहे. यातून प्रत्येक इंटरनेट साथीला आपल्या परिसरातील ४ गावांमध्ये काम करायचे आहे. यात गावांमध्ये संपर्क करत इंटरनेट साथी सहकारीच्या मदतीने व्हॉट्स अप, फेसबुक, जीमेलवर आपले खाते तयार करत वेळोवेळी अहवाल सादर करायचा. तेथील महिलांमध्ये ई-साक्षरता रुजवायची, त्यांचे प्रबोधन करायचे आदी कामे अपेक्षित आहेत.

या ई- साक्षरता प्रशिक्षणामुळे व्यवसायवृद्धी होईलच, पण बदलत्या घडामोडींबाबत महिलांकडे अद्ययावत ज्ञान राहील. त्यांना त्यांच्या कामकाजाविषयी अपेक्षित माहिती एका क्लिक सरशी समोर येणार असून कोठेही त्यांची अडवणूक होणार नाही. यामुळे त्यांचा आत्मविश्वास तसेच कामाचा वेग वाढेल अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.

Story img Loader