लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: घरातील प्रतिकूल परिस्थिती, शाळेची भीती असो वा शिक्षणात फारशी आवड नसणे असो; आणि त्यात उलटून गेलेले वय यांमुळे काही जणांची शिक्षणाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसविण्यासाठी आता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीच पुढाकार घेतला आहे.
मुंबईस्थित टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या नवभारत साक्षरता अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजनगर परिसरातील महापालिकेच्या मध्यवर्ती शाळा क्रमांक एकमध्ये प्रौढशिक्षणासाठी आता रात्रशाळा प्रकल्प सुरू झाला आहे.
हेही वाचा… जळगाव जिल्ह्यातून चार गुन्हेगार हद्दपार; पोलीस अधीक्षकांचे आदेश
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या रात्रशाळा उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, महापालिकेचे उपायुक्त अभिजित बाविस्कर, शिक्षणाधिकारी दीपाली पाटील, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे विद्यार्थी मुकेश मुनेश्वर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रौढ साक्षरतेला चालना देण्यासाठी, विशेषत: स्थलांतरित आणि समाजातील दुर्बल घटकांमध्ये शिक्षणाची गंगा आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे सांगितले.