लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या तंबाखूमुक्त शाळा अभियान सुरु आहे. याअंतर्गत राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या एकूण ३२० शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. तंबाखूमुक्त होणारा सिन्नर हा नाशिक जिल्ह्यातील नववा तालुका झाला आहे. तालुक्यातील शाळांनी शासकीय आदेशानुसार तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे नऊ निकष पूर्ण केले. विविध उपक्रमांद्वारे आपल्या शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत. यामुळे भावी पिढी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून प्रवृत्त होण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सिन्नर येथील पंचायत समितीत एका कार्यक्रमात तालुका तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून डॉ. शिल्पा बांगर यांनी अधिकृतरित्या जाहीर केले. कार्यक्रमात सिन्नर तालुक्यातील सर्वच शाळांचा आणि केंद्रप्रमुखांचा सन्मान आरोग्य विभागाचा जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि सलाम मुंबई फाउंडेशनमार्फत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, विस्तार अधिकारी मंजुषा साळुंखे, कैलास सांगळे, बाळासाहेब फड, उज्वला पाटील आणि सलाम मुंबई – एव्हरेस्ट फाउंडेशनचे अजय चव्हाण, गणेश कातकडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कविता पवार यांनी केले.

आणखी वाचा-महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

सिन्नर हा नाशिक जिल्ह्यातील नववा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका बनला आहे. यापूर्वी जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, चांदवड, कळवण, पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि देवळा या तालुक्यांतील शाळांनी सर्व निकष पूर्ण केल्याने ते तंबाखूमुक्त शाळांचे तालुके म्हणून घोषित झाले आहेत. संपूर्ण नाशिक जिल्हा तंबाखूमुक्त शाळांचा होण्यासाठी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन विशेष प्रयत्न करीत आहेत.