लोकसता विशेष प्रतिनिधी

नाशिक : परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असताना जिल्ह्यतील धरणे पूर्ण क्षमतेने भरतात की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यतील १९ धरणे जवळपास तुडुंब झाली असून उर्वरित सात धरणे पूर्ण क्षमतेने भरणे अद्याप बाकी आहे. जिल्ह्यतील धरणांमध्ये सध्या ६२ हजार ८१९ दशलक्ष घनफूट अर्थात ९५ टक्के जलसाठा आहे. नाशिक शहरास पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तुडुंब भरले असले तरी या समूहातील काश्यपी ७५ तर गौतमी गोदावरीत ८७ टक्के पाणी आहे. परतीच्या पावसावर पुढील भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने पुढील आठ महिन्यांसाठी पाच हजार ६०० दशलक्ष घनफूट म्हणजे गंगापूर धरणातील जलसाठय़ाइतके पाणी गंगापूर, मुकणेतून मिळावे अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यत या हंगामात आतापर्यंत १६ हजार २८५ मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने शहर परिसरात उघडीप घेतली असून आता त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात २३ हजार ५१९ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला असला तरी त्याचे ठिकाण बदलले आहे. मुसळधार पावसाच्या भागात कमी आणि दुष्काळी भागांत अधिक पाऊस झाला. जिल्ह्यतील काही धरणे पूर्ण क्षमतेने न भरण्यामागे ही बाब कारक ठरली. अर्थात गेल्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यत पूरस्थिती निर्माण झाली होती. या हंगामात त्याचा प्रवास कसा राहील यावर बरेच काही अवलंबून आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यतील २४ धरणांची ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट इतकी क्षमता आहे. गेल्या वर्षी या धरणांमध्ये ९९ टक्के जलसाठा होता. या वर्षी हे प्रमाण चार टक्क्यांनी कमी आहे. पिण्यासह शेतीसाठी महत्त्वाची मोठी, मध्यम धरणे भरल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जिल्ह्यतील गंगापूर, आळंदी, पालखेड, तिसगाव, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा, पुनद, माणिकपूंज, वाघाड ही १८ धरणे जवळपास तुडुंब झाली आहेत. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात सध्या ८९ टक्के जलसाठा असला तरी विसर्ग थांबविल्यास तेदेखील पूर्ण क्षमतेने भरेल. गुरुवारी आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे. काश्यपी धरणात १३९१ (७५ टक्के), गौतमी गोदावरी १६२२ (८७ टक्के), करंजवण ४८८० (९१ टक्के), ओझरखेड १७०७ (८० टक्के) आणि मुकणे धरणात ६०३१ (८७ टक्के) जलसाठा आहे. ही पाच धरणे तुडुंब झाल्यास जिल्ह्यतील जलसाठा १०० टक्क्यांवर पोहोचू शकतो.

महापालिकेकडून ५६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी

शहराची पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षीच्या तुलनेत ६०० दशलक्ष घनफूट अधिक म्हणजे पाच हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली आहे. गंगापूर धरणाची पाच हजार ६३० दशलक्ष घनफूट इतकी क्षमता आहे. शहरास गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणातून पाणी मिळते. महापालिकेने यंदा गंगापूर धरणातील जलसाठय़ाइतक्या पाण्याची मागणी केलेली आहे. शहरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. यामुळे सुमारे ५० हजार तरंगती लोकसंख्या असते. यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मागील वर्षी महापालिकेला गंगापूर धरणातून ३६००, दारणामधून ४०० आणि मुकणे धरणातून एक हजार दशलक्ष घनफूट असे पाच हजार दशलक्ष घनफूटचे आरक्षण मंजूर करण्यात आले होते. तुलनेत पाण्याचा काहीअंशी अधिक वापर झाला. पाणी आरक्षणावरून यंदा महापालिका आणि पाटबंधारे विभागात बेबनाव होण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader