जिल्ह्याची बलस्थाने लक्षात घेता जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या (जेएनपीए ) वतीने निफाड तालुक्यात बहुप्रकल्पीय शुष्क बंदर सुरू करण्यात येणार आहे. शासनाने यासाठी २५० कोटी गुंतविले असून या अनुषंगाने पायाभूत सोयी सुविधा देण्यात येत आहे. विशेष आर्थिक क्षेत्र (सेज) अनुषंगाने सर्व विभाग या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत सात हजार पाणी मीटर बसविण्याची योजना

शुष्क बंदर होण्यासाठी निफाडसह नाशिक तालुक्यातील राजकीय मंडळी प्रयत्नशील होती. अखेर निफाड तालुक्यातच हे बंदर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी येथे गुंतवणूकदार परिषद झाली. तत्पूर्वी सेठी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सेठी यांनी नाशिकचे व्यावसायिक आणि औद्योगिक मूल्य लक्षात घेता या ठिकाणी बहुप्रकल्पीय शुष्क बंदर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. सेज आणि बंदरचे काम सारखे आहे. या अनुषंगाने व्यावसायिक, उद्योजकांना आयात-निर्यातीसाठी आवश्यक शासकीय परवानग्या मिळवून देण्यासाठी काम करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>धुळे : बहिणीची बदनामी केल्याने युवकाचा खून; मोहाडीतील खूनाचा १२ तासात उलगडा

यामुळे पैसे आणि वेळ वाचणार आहे. राज्यात सांगली, वर्धा, जालना आणि नाशिक येथे शुष्क बंदर करण्यात येणार आहे. वर्धा आणि जालना परिसरात बंदराचे काम अंतिम टप्प्यात असून नाशिकमध्येही लवकरच कामास सुरूवात होईल. यामुळे उद्योग, व्यवसाय यातील अस्थिरता थांबेल, त्यातील धोक्याची तीव्रता कमी होईल. आयात- निर्यातीसाठी मालाची देवाण घेवाण सुलभ होईल. यामुळे नाशिकच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकण्यासाठी हा प्रयत्न आहे. निफाड येथे या बंदरासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्यात गुंतवणूक करण्यात येणार आहे. बंदर सक्षमपणे कार्यान्वित होण्यासाठी रस्ता प्राधिकरण तसेच रेल्वेशी चर्चा सुरू आहे. समृध्दी महामार्गचा फायदा सर्व प्रकल्पांना होणार आहे. या सर्व सेवेचा लाभ उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन सेठी यांनी केले आहे.