लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केल्यानंतर माजी आमदार तथा शिवसेना (ठाकरे गट) नेत्या निर्मला गावित यांना उमेदवारीसाठी पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गावित स्वगृही आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे म्हटले होते. इगतपुरीची जागा ठाकरे गटाला सुटणार नसल्याने काँग्रेसकडून निवडणूक लढवावी का, याबाबत महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा, असे गावित यांनी म्हटले आहे.

आमदार खोसकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे. आदिवासी बांधवांच्या मेळाव्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ काँग्रेसला मानणारा असल्याचा दावा केला होता. जो आमदार पक्ष सोडून गेला तो पराभूत होतो. असा दाखला काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा नामोल्लेख करून दिला होता. मागील निवडणूक गावित यांनी काँग्रेस सोडून एकसंघ शिवसेनेकडून लढविली होती. खोसकर यांनी त्यांना पराभूत केले होते. शिवसेना दुभंगल्यानंतर त्या ठाकरे गटाबरोबर राहिल्या. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता नसल्याने त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळते का, याची चाचपणी चालविल्याचे सांगितले जाते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी गावितांशी संपर्क साधून स्वगृही परतण्याचे आवाहन केले. आपणही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे गावित यांनी सांगितले.

आणखी वाचा-डाळिंब, कांदा व्यापाऱ्यांची परप्रांतीयांकडून फसवणूक

या जागेसाठी पक्षाला उमेदवार आयात करावा लागणार नाही. काँग्रेसकडे जवळपास २० इच्छुकांचे अर्ज आले आहेत. जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊन स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, असे पटोले यांनी म्हटले होते. माजी आमदार गावितांनी उमेदवारी मिळाल्यास पक्षनेतृत्वाच्या सल्ल्याने स्वगृही जाण्याची तयारी ठेवली आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष मिळून जो निर्णय घेतील, तो आपणास मान्य राहील, असे गावित यांनी सांगितले.

निष्ठावंतांवर अन्याय

महायुती आणि महाआघाडी यांच्यातील घटकपक्षांमध्ये एकेका जागेसाठी रस्सीखेच सुरु आहे. विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्यांना जागा सोडली जाण्याची अधिक शक्यता असल्याने इतर घटकपक्षांमधील इच्छुकांची कोंडी होत आहे. त्यातच निवडून येण्याची क्षमता पाहून सर्वच पक्ष उमेदवार ठरवू लागल्याने त्यासाठी इतर पक्षांकडून आलेल्यांचाही विचार होत आहे. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजीची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirmala gavit on way to back to congress insisting on candidacy from igatpuri mrj