नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुलाखाली गोदावरी नदीपात्रात निळ्या पूररेषेत सुरू असलेले मॅकेनिकल दरवाजे (गेट) बसविण्याचे काम तातडीने थांबवावे आणि आहे ती स्थिती कायम ठेवावी, अशी मागणी याचिकाकर्ते निशिकांत पगारे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.नाशिक स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गोदावरी नदीपात्रात मॅकेनिकल दरवाजे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या समितीच्या जुलै २०२४ मध्ये झालेल्या बैठकीत अहिल्यादेवी होळकर पुलाखाली गोदावरी नदीत निळ्या पूररेषेत मॅकेनिकल दरवाजे उभारण्याचे काम सुरू असल्याचा विषय पगारे यांनी मांडला होता. त्यासाठी सिमेंट काँक्रिटच्या सहाय्याने काम केले जात आहे. हे काम तातडीने बंद करावे आणि महानगरपालिकेने ते काढून टाकावे, अशी मागणी आपण केली होती, याकडे पगारे यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे.

त्यावेळी स्मार्ट सिटी कंपनीने काँक्रिटचे काम संपुष्टात आल्याचे म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात ते अलीकडेही सुरू असल्याचे उघड झाले. या भागातून जात असताना मॅकेनिकल प्रवेशद्वारासाठी सिमेंट काँक्रिटचे बांधकाम अजूनही सुरू असल्याचे निदर्शनास आले. गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी दाखल याचिकेत न्यायालयाने स्थानिक विषयांवरील वाद समितीच्या माध्यमातून मिटविण्याचे सूचित केले आहे, असा दाखला पगारे यांनी दिला. न्यायालयाचा आदेश येईपर्यंत अहिल्यादेवी होळकर पुलाखालील गोदावरी नदीपात्रातील सिमेंट काँक्रिटचे हे काम थांबविण्याची मागणी समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.