रामकुंडाची स्वच्छता करताना विघटन न झालेल्या अस्थि मोठ्या प्रमाणावर आढळून येणे आणि अविघटनास रामकुंडात झालेले काँक्रिटीकरण कारणीभूत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमिवर बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रामकुंडासह अन्य कुंडाची पाहणी करुन या संदर्भातील कागदपत्रे मागवली आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी रामकुंड परिसराची पाहणी केली. यावेळी स्मार्ट सिटीचे अधिकारीही उपस्थित होते. रामकुंडात अस्थिविसर्जनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरीक येत असतात. मागील कुंभमेळ्यात गोदाकाठाचे मूळ रुप बदलत सिमेंटचे कठडे तयार करण्यात आले. रामकुंडही यातून सुटले नाही. याचा विपरीत परिणाम अस्थिविसर्जनावर झाला असल्याकडे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी लक्ष वेधले. काँक्रिटीकरणामुळे नैसर्गिक झरे आटले आहेत. रामकुंडात अस्थिंचे विघटन नैसर्गिक पध्दतीने होत असते. परंतु, कुंडात सिमेंटचे काम करण्यात आल्याने ही नैसर्गिक प्रक्रिया थांबली आहे. यामुळे कुंडात अस्थिंचे विघटन न होता त्या पडून आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून अस्थिंचे ढिग उपसले जात आहेत. लोकांच्या श्रध्देशी हा खेळ होत असल्याचा आरोपही जानी यांनी केला आहे.
रामकुंडासह गोदाकाठावरील काँक्रिटीकरण काढण्यात यावे, नैसर्गिक झरे मुक्त करावे, अशी मागणी जानी यांनी केली आहे. स्मार्टसिटी कडून गोदाकाठ परिसरात सुरू असलेल्या कामांना न्यायालयातून स्थगिती आणली असल्याचेही त्यांनी सांगितले. जानी यांच्या पाठपुराव्या मुळे आतापर्यंत अनामिक, ददस्वामी, राम गया, पेशवे आणि खंडोबा या कुंडांमधील काँक्रिटीकरण काढण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. येथील सिमेंट काढण्यात येत असल्याने पाण्याची पातळी वाढत आहे.
दुसरीकडे, रामकुंड, गोपिकाबाईंचा तास ,लक्ष्मण कुंड, धनुष कुंड, सीता कुंड, अहिल्यादेवी कुंड, सारंगपाणी कुंड, पाच देऊळ कुंड, दुतोंडया मारूती कुंड, मुक्तेश्वर कुंड, वैशंपायन कुंड अशा १२ कुंडांमधीलही काँक्रिटीकरण काढण्यात यावे, अशी मागणी जानी यांनी केली आहे.