संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या सिटीलिंकच्या वतीने बुधवार आणि गुरूवार या दिवशी त्र्यंबकेश्वरसाठी जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवानिमित्त हजारो वारकरी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत आहेत. पायी दिंडी दाखल होत असल्या तरी बुधवारी मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> नाशिक : नीलेश राणे यांना अटक करा ; ठाकरे गटाची पोलिसांकडे मागणी
सद्यस्थितीत सिटीलिंकच्यावतीने तपोवन आगारातून १५ गाड्यांच्या माध्यमातून दिवसभरात १०६ तर, नाशिकरोड आगारातून १० गाड्यांच्या माध्यमातून ६० फेऱ्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात. या नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त यात्रोत्सवानिमित्त तपोवन आगारातून सहा जादा बससेवेच्या माध्यमातून ४८ तर नाशिकरोड आगारातून चार जादा बससेवेच्या माध्यमातून ३२ अश्या एकूण १० जादा गाड्यांच्या माध्यमातून ८० अधिक फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस ही बससेवा असले. जादा बससेवा मिळून या काळात तपोवन आगारातून १५४ तर, नाशिकरोड आगारातून ९२ फेऱ्या नियोजित आहेत. भाविकांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकने केले आहे.