नाशिक : शहरालगतच्या चांदशी आणि जलालपूर भागात मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेतील विहिरी आणि कुपनलिका ताब्यात घेऊन त्या माध्यमातून स्थानिकांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एनएमआरडीए) केले आहे. अशा विहिरी आणि कुपनलिकांची माहिती संकलित करण्याची सूचना पंचायत समिती तसेच चांदशी आणि जलालपूर ग्रामपंचायतीला करण्यात आली आहे.

गंगापूर रस्त्यालगत गोदावरी नदीच्या पलीकडे चांदशी, जलालपूर शिवारात निवासी वसाहत वेगाने विस्तारत आहे. या दोन्ही गावांची लोकसंख्या वाढत असताना पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन वा तत्सम पायाभूत सुविधांची वानवा आहे. परिसरातील निवासी वसाहतींचे प्रश्न सोडविण्यासाठी एनएमआरडीए आणि जिल्हा परिषदेने एकत्रित काम करण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने चांदशी व जलालपूर शिवारात पाणी पुरवठ्यासाठी नियोजन केले जात असल्याची माहिती एनएमआरडीएचे आयुक्त माणिकराव गुरसळ यांनी दिली.

या दोन्ही गावातील विविध प्रयोजनासाठीच्या अभिन्यास नकाशांना एनएमआरडीए मंजुरी देते. काही अभिन्यासातील जागांमध्ये एखादी विहीर वा कुपनलिका असल्यास ती शक्यतो अभिन्यासात सक्तीने सोडावयाच्या १० टक्के खुल्या जागेत दर्शविलेली असते. चांदशी व जलालपूर ग्रामपंचायत क्षेत्रात मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत असणाऱ्या विहिरी व कूपनलिकांची माहिती संकलित करण्यास पंचायत समिती व ग्रामपंचायतीला सांगण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशा विहिरी व कुपनलिका ताब्यात घेतल्या जातील. ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाशांना पाणी पुरवठ्यासाठी त्याचा वापर करावा, असे एनएमआरडीएने सूचित केले आहे. जिल्हा परिषद व एनएमआरडीएने एकत्रितपणे काम करण्याचा शुभारंभ चांदशी व जलालपूरमधून केला आहे.

निधी देण्याची तयारी

मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेतील विहिरी आणि कूपनलिकातील पाण्याचा वापर आसपासच्या शेतकरी वर्गाकडून होण्याची शक्यता आहे. मुळात अभिन्यासातील या विहिरींशी मूळ मालकाचा संबंध राहत नाही. सध्या ग्रामपंचायत आपल्या पातळीवर पाणी पुरवठ्याचा प्रयत्न करते. काही टाक्या बांधण्यात आल्या. परंतु, त्यांना मर्यादा आहेत. खुल्या जागेतील अशा विहिरी अधिग्रहीत करून ग्रामपंचायतीला पाणी पुरवठ्यासाठी व्यवस्था करून दिली जाईल. या अनुषंगाने दुरुस्ती व अन्य कामांसाठी निधी देण्याची तयारी एनएमआरडीएने दाखविली आहे.