नाशिक – जिल्ह्यातील प्रमुख अशा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवरील राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी खासदार तथा सभापती देविदास पिंगळे यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. त्यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १५ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. खुद्द पिंगळे यांच्यासह तीन संचालक यावेळी अनुपस्थित राहिले. पिंगळेंचे कट्टर विरोधक शिवाजी चुंबळे यांना अलीकडेच पक्षात घेऊन भाजपने बाजार समितीवर आपले अधिपत्य स्थापन केले आहे.
सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात शिवाजी चुंबळे यांच्या पुढाकारातून १५ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर मंगळवारी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती सभागृहात झालेल्या सभेत मतदान झाले. यावेळी खुद्द सभापती पिंगळे आणि त्यांचे दोन सहयोगी संचालक गैरहजर राहिले. त्यामुळे १५ विरुद्ध शून्य मतांनी हा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याचे मंगरुळे यांनी जाहीर केले. या निकालाने अनेकांनी पिंगळेंची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले. नवीन सभापती निवडीसाठी जिल्हा प्रशासनाकडून लवकरच कार्यक्रम दिला जाईल, तोपर्यंत हंगामी सभापती म्हणून विनायक माळेकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे चुंबळे यांनी सांगितले. नवीन सभापतीची निवड लवकरच होईल
२०२३ मध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत पिंगळे आणि चुंभळे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली होती. त्यात पिंगळे यांच्या पॅनलने १८ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. चुंबळे गटाला सहा जागा मिळाल्या होत्या. तेव्हा सभापतीपदी बिनविरोध निवडून आलेल्या पिंगळे यांच्या वर्चस्वाला भगदाड पाडण्यात अखेर चुंबळे गटाने यश मिळवले. अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पिंगळे यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिक्रिया देणे टाळले. यापूर्वी त्यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संचालकांची पळवापळवी केल्याचा आरोप केला होता. ते आरोप चुंबळे गटाकडून फेटाळण्यात आले होते. भाजपमध्ये दाखल होऊन चुंबळे यांनी पिंगळे यांची बाजार समितीतील सद्दी संपुष्टात आणली आहे.