शहर व जिल्ह्य़ातील दुष्काळ आणि टंचाईच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने रंगपंचमी साजरी न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरै यांनी दिली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील अल्प जलसाठा लक्षात घेऊन शहरात सध्या दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. जुलैमध्ये पाऊस आलाच नाही तर शहरात पाणीसंकट तीव्र होणार आहे. ऑक्टोबर २०१५ पासूनच शहरातील पाणी संकटाकडे अनेकांनी लक्ष वेधले होते. परंतु पालकमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच वेळी ठोस पाऊल उचलले असते तर महापालिकेवर पाणीकपात करण्याची वेळ आलीच नसती, असेही खैरे यांनी म्हटले आहे. टंचाईचे सावट यंदा रंगपंचमी, होळी, धूलिवंदन या सणांवर पडणार आहे. त्यामुळेच रंगपंचमी साजरी न करण्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ठरविले आहे. रंगपंचमीसाठी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याने रंगपंचमी साजरी न केल्यास पाणीबचत होऊ शकते, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे खैरे यांनी म्हटले आहे. शहरात ऐतिहासिक रहाडी असून रंगपंचमीसाठी त्यांच्यात पाणी साठविले जाते. यंदाची टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन रहाडींमध्ये पाणी साठविण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणीही खैरे यांनी प्रशासनास केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा