धुळे : बोलताना अडखळणाऱ्या ५० बालकांवर जिल्ह्यातील साक्री ग्रामीण रुग्णालयात यशटंग टाय ही शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या शत्रक्रिया झाल्या असून भविष्यात आता या बालकांना स्पष्टपणे बोलता येणार आहे. धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाड्या आणि शाळा तपासणीत आरोग्याशी निगडीत समस्या आढळून येणाऱ्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. त्यासाठी काही समस्याग्रस्त बालकांना उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयात किंवा शासनाशी संलग्नित रुग्णालयात पाठविण्यात येते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. महेश भडांगे, साक्री ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांच्या मार्गदर्शनात साक्री ग्रामीण रुग्णालयात बोलताना अडखळणाऱ्या ५० बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयाचे भूलतज्ज्ञ डॉ. रवि सोनवणे, दंत शल्यचिकित्सक डॉ. नितिन पाटील, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे समन्वयक राजीव भामरे यांचे सहकार्य लाभले.