लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : अयोद्धेतील राम मंदिराचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. हिंदू धर्मात पौष महिन्यात शुभकार्य केले जात नाही. असे असताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खरे तर राम दैवत असल्याने त्यावरून राजकारण होणे नको, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

येथील अनंत कान्हेरे मैदानात २३ जानेवारी रोजी उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. राऊत हे शनिवारी सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे हे या सभेद्वारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकतील. ठाकरे हे २२ जानेवारील सायंकाळी सहा वाजता काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर गोदावरी काठावर आरती करतील, असेही राऊत यांनी सांगितले.

आणखी वाचा-नाशिकमध्ये युवक महोत्सवानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम

देवेंद्र फडणवीस स्वार्थी, संधीसाधू आहेत. त्यांना सत्तेची लालसा आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा प्रश्न त्यांनी केला.

निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची कसोटी

लोकसभा आणि अन्य सर्व निवडणुका म्हणजे शिवसेना ठाकरे गटाची कसोटीच असून त्या जिंकण्यासाठी तसेच नाशिक येथील शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी नाशिक येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत केले. युवासेना सचिव वरुण सरदेसाई हेही उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी आणि विशेषतः युवा सेनेने कंबर कसावी, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.

Story img Loader