माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त गुरूवारी आयोजित वाचन प्रेरणा दिन शहरातील शाळांमध्ये दप्तराविना साजरा करण्याचे केलेले नियोजन काहीसे कोलमडल्याचे पहावयास मिळाले. ही सूचना काही शाळांमार्फत योग्य पध्दतीने न पोहोचल्याने विद्यार्थी नेहमीप्रमाणे दप्तर घेऊन शाळेत दाखल झाले. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्या पाश्र्वभूमीवर, या दिवशी कोणी विद्यार्थ्यांने शाळेत दप्तर न आणता वाचनालयात पुस्तकांचे वाचन करावे असे सूचित करण्यात आले. शिक्षण विभागाने घाईघाईत ही सूचना शाळांपर्यंत पोहोचवली. मात्र, काही शाळांमध्ये ती विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकली नाही. त्यामुळे गुरूवारी शहरातील अनेक विद्यार्थी पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन पोहोचले. या दिवशी दप्तर आणावयाचे नव्हते याची कल्पना शाळेकडून आधी दिली गेली नसल्याची तक्रार त्यांनी केली. शालेय विद्यार्थ्यांवर दप्तराच्या पडणाऱ्या ओझ्यावरून न्यायालयाने शासनाला फटकारले आहे. त्याचे वजन कमी करण्याची सूचनाही केली आहे. प्रेरणा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी दप्तराचे ओझे वाहू नये म्हणून वाचनालयात पुस्तक वाचनाचा कार्यक्रम ठेवण्याची सूचना दिली गेली. मात्र काही शाळांचा अपवाद वगळता ही संकल्पना प्रत्यक्षात आली नाही. दप्तर घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना घरी जाईपर्यंत त्याचे ओझे वहावे लागले. या दिवशी शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही शाळांनी ग्रंथालयामार्फत वर्गात वाचन पेटय़ा दिल्या तर काही शाळांमध्ये डॉ. कलाम यांच्याविषयीची माहितीपर व्याख्याने देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा