* यंत्र फोडून २८ लाखांची रक्कम लंपास * बँकांकडून सुरक्षिततेची उपाययोजना नाही
नाशिक : नाशिक रोडच्या उपनगर भागात स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘एटीएम’ गॅस कटरच्या साहाय्याने फोडून चोरटय़ांनी २८ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ‘एटीएम’च्या सुरक्षिततेविषयी बँकांच्या व्यवस्थापनास उपाय करण्याविषयी निर्देश देऊनही त्यांच्याकडून उदासीनपणा दाखविण्यात येत असल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पोलीस आयुक्त परिमंडळ दोनच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘एटीएम’ केंद्र आहे. तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी पहारेकरी नसल्याचा फायदा घेत काही चोरटय़ांनी ‘एटीएम’ यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला होता. चोरटय़ांचा प्रयत्न फसल्याने त्यांनी तेथून पोबारा केला. ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणातील काही संशयितांना अटकहीकेली होती. याच घटनेची पुनरावृत्ती गुरुवारी रात्री घडली.
चोरटय़ांनी ‘एटीएम’ केंद्राचा दरवाजा उघडून गॅस कटरच्या साहाय्याने यंत्र फोडले आणि ‘एटीएम’ यंत्रातून पैसे काढून पोबारा केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये बंदिस्त झाला असून सकाळी उशिरा हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच या संदर्भात उपनगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. बँक प्रशासनाशी चर्चा केली असता ‘एटीएम’मधून चोरटय़ांनी २८ लाखांची रोकड लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
सायंकाळी ‘एटीएम’मध्ये पैशांचा भरणा करण्यात आल्यावर किती जणांनी पैसे काढले तसेच आधी काही रक्कम होती का?
यावरून एकूण नेमकी किती रक्कम लांबवली ते स्पष्ट होणार आहे. या प्रकारास बँकेचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याने या घटना सातत्याने घडत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
बँकांना वारंवार सूचना दिल्या आहेत.
शहर परिसरात ‘एटीएम’ फोडण्याच्या घटना पाहता शहरातील राष्ट्रीयीकृतसह अन्य काही बँकांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना सुरक्षाविषयी सुचना केल्या आहेत. समाज माध्यमांद्वारेही गट तयार करून वारंवार निर्देश दिले आहेत. ‘एटीएम’ केंद्राबाहेर किमान सुरक्षा रक्षक नेमावा, त्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवावेत यासह अन्य काही उपाययोजना करण्यास सांगितल्या आहेत. बँका तसेच ‘एटीएम’ केंद्रांची चोरटय़ांकडून आधी पाहणी केली जाते आणि तथील त्रुटींचा आधार घेत चोरटे संधी साधतात. बँकेला सुरक्षा रक्षक किंवा अन्य काही व्यवस्था करणे जमत नसेल तर शाखा किंवा केंद्र बंद करा, अशी सूचनाही पोलिसांनी केली आहे. बँक व्यवस्थापन तसेच प्रशासन याबाबत कमालीचे उदासीन आहे.
– डॉ. रवींद्रकुमार सिंगल (पोलीस आयुक्त, नाशिक)