राजकीय विरोधामुळे प्रकाशझोतात आलेला उत्तर भारतीयांचा छठपूजा सण मंगळवारी गोदावरीच्या काठावर उत्साहात पार पडला. काही वर्षांपूर्वी या निमित्ताने परप्रांतीय शक्ती प्रदर्शन करत असल्याचा आक्षेप घेत विरोध करणाऱ्या मनसेला कालौघात या दिवसाचा विसर पडल्याचे अधोरेखित झाले. सिंहस्थात गर्दीने फुललेला गोदा काठचा परिसर छठपूजेच्या निमित्ताने पुन्हा एकदा फुलल्याचे पाहावयास मिळाले.
मुंबईसह नाशिक व इतर शहरांमध्ये उत्तर भारतीयांकडून साजरा केला जाणारा छठपूजा सण काही नवीन नाही. मात्र, परप्रांतीयांना विरोध करणाऱ्या मनसेने या सणाला विरोध दर्शविल्याने तो एकदम प्रकाशझोतात आला होता. मनसेच्या विरोधाच्या सावटाखाली काही वर्षे साजरा कराव्या लागलेल्या सणाने आता मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील सातपूर, अंबड, चिंचोळे या भागात उत्तर भारतीय मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहेत. छठपूजेनिमित्त संबंधितांनी जय्यत तयारी केली. दुपारनंतर भाविकांचे जत्थे गोदावरी काठ अर्थात रामकुंड परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली. उत्तरप्रदेश व बिहार राज्यात या पूजेला विशेष महत्त्व आहे. शेकडो महिला सहकुटुंब पूजा साहित्य घेऊन दाखल झाल्या. सायंकाळी सूर्याला अध्र्य देऊन पूजन करण्यात आले. सिंहस्थात हा परिसर भाविकांच्या गर्दीने जसा फुलला होता, त्याची अनुभूती छठपूजेनिमित्ताने आली. पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे पूजन करण्यात आल्याचे महिलांकडून सांगण्यात आले. या दिवशी सूर्यास्त ते दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय असा उपवास ठेवला जातो. या भाविकांनी स्थानिक पुरोहितांची मदत न घेता आपापल्या पद्धतीने पूजन केले. सूर्य जसजसा मावळतीला गेला, तसतसा भाविकांचा ओघ वाढला.
कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये या सणाला काही वर्षांपूर्वी तीव्र विरोध झाला होता. उत्तर भारतीय संघटनांनी मनसेच्या भूमिकेवर आक्षेप घेऊन पोलीस बंदोबस्तात उत्सव साजरा केला होता. कालांतराने मनसेच्या विरोधाची धार बोथट झाली. मंगळवारी तर या पक्षाचे पदाधिकारी छठपूजा कधी आहे याबद्दलही अनभिज्ञ होते. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शक्तिप्रदर्शनाद्वारे साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला आजही मनसेचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. ‘कडोंमपा’ निवडणुकीच्या निकालामुळे त्यांनी धावत्या दौऱ्यात संवाद न साधणे पसंत केले. यामुळे राज यांच्या सध्याच्या भूमिकेचा उलगडा झाला नसल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त तैनात करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली.
छठपूजा उत्साहात मनसे मात्र निरुत्साहात
मुंबईसह नाशिक व इतर शहरांमध्ये उत्तर भारतीयांकडून साजरा केला जाणारा छठपूजा सण काही नवीन नाही.
Written by मंदार गुरव
First published on: 18-11-2015 at 01:01 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North indians celebrate chhath puja on godavari river