लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: यंदाच्या उन्हाळ्यात मे महिन्यात दिवसेंदिवस परिसरात पारा उंचावत आहे. मागील दोन दिवसात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. जळगावमध्ये पारा ४४ अंशावर पोहोचला तर नाशिक जिल्ह्यात काही भागात तापमान ३९ अंशावर गेले आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून जळगावमध्ये तापमान ४६ वा ४७ अंशाचा टप्पा गाठू शकते असे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. मात्र, यामुळे एप्रिल काही प्रमाणात सुसह्यही झाला होता. आता मेच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाच्या कडाक्याने कहर केला असून पारा उंचावत आहे. पुढे महिनाभर उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. मंगळवारी जळगावात उच्चांकी ४३-४४ अंशांपर्यंत नोंद झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. आता तापमानाचा पारा ४३ अंशांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. रात्री उकाडा कमी होणार नाही. १५ जूननंतर पारा ४० अंशांच्या खाली येणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी ३४ दिवस जळगावकरांना उष्णतेत राहावे लागणार असल्याने उष्माघातापासून काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

आणखी वाचा-नाशिक : चाळीतील उन्हाळ कांदा फेकण्याची वेळ; पाऊस, वाईट हवामानाने प्रतवारीवर परिणाम

टळटळीत उन्हामुळे डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे, लहान मुलांचा आहार घेण्यास नकार, चिडचिड, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, रक्तस्त्राव होणे, तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे, अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. चेतन खैरनार यांनी सांगितले.

नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, दुपारी स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाकावेळी दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून हवा खेळती राहील. उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत. अनवाणी उन्हात चालू नये. लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना आतमध्ये ठेऊन गाडी बंद करू नये. चहा, कॉफी, मद्य, खूप साखर असलेली व कार्बोनेडेट द्रव्याचे सेवन टाळावे. प्रथिनांची अधिक मात्रा असलेले पदार्थ तसेच शिळे अन्न टाळावे. सैलसर व सुती कपडे शक्यतो पांढरे कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.

आणखी वाचा- नांदगावच्या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात उपोषण- किसान सभेचा इशारा

नाशिकही तप्त

नाशिकमध्ये एकाच दिवसात तापमानात दोन ते अडीच अंशांनी वाढ झाली आहे. मंगळवारी पारा ३९ अंशावर पोहोचला. दुपारनंतर पुन्हा ऊन-सावलीचा खेळ सुरू होऊन वातावरणात कमालीचा उष्मा जाणवतो. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. यंदा उन्हाळ्यात बेमोसमी पाऊस, गारपीट आणि ऊन-सावलीच्या खेळामुळे एप्रिल अखेरपर्यंत उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नाही. दिवसभर कडक ऊन, दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसून येत होते. अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने लग्न समारंभासह सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण आता तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रविवार, सोमवार सलग दोन दिवस ३७ अंशांवर असलेला पारा मंगळवारी ३९ अंशांवर गेला. अगदी सकाळपासून वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागतो. दुपारी रणरणत्या उन्हामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ कमालीची घटली. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाली. शहर, परिसरात दरवर्षी मार्च ते मे या महिन्यात पारा ४० ते ४१ अंशांवर राहतो. यावर्षी उन्हाळ्यातील पहिले दोन महिने उन्हाचा नेहमीसारखा तडाखा जाणवला नाही. आतापर्यंत चार ते पाच दिवसच पारा ३९ अंशांपर्यंत पोहचला आहे. मंगळवारी सकाळी कडक ऊन होते. तापमान वाढू लागल्यामुळे रसवंती, शीतपेय, मसाले ताक, आइस्क्रीम आदी विक्रेत्यांच्या दुकानावर गर्दी दिसून येत आहे. यावर्षी शीतपेयांचा हंगाम पुरेशा उन्हाअभावी फुललाच नाही. आता कुठे तापमान वाढू लागल्याने शीतपेयांना मागणी वाढली आहे. मनमाडसारखी स्थिती नाशिकसह इतर भागात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North maharashtra heats up 44 degrees temperature in jalgaon mrj
Show comments