नाशिक: उत्तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी चार महिलांना उमेदवारी दिली होती. मविआच्या चौघी पराभूत झाल्या. तर महायुतीच्या तिघी विजयी झाल्या. जळगाव जिल्ह्यात तर, १७ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी मोजून तीन महिलांनी दुसऱ्या क्रमाकांची मते मिळवून अयशस्वी झुंज दिली.

महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना भरघोस लाभ झाला. त्यांच्या महिला उमेदवारही या योजनेमुळे तरल्या. नाशिक शहरात महायुतीकडून भाजपने नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे तर, राष्ट्रवादीने (अजित पवार) देवळालीमधून सरोज अहिरे या विद्यमान आमदारांनाच पुन्हा रिंगणात उतरविले. देवळाली मतदार संघातच महायुतीकडून शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) याही अधिकृत उमेदवार होत्या. हिरे यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना उमेदवारी देण्यास भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. परंतु, तरीही पक्षनेतृत्वाने त्यांनाच उमेदवारी दिल्याने माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी पक्षत्याग करुन मनसेची उमेदवारी केली. नाशिक मध्य मतदार संघातही उमेदवारीसाठी फरांदे यांना पक्षाच्या तिसऱ्या यादीपर्यंत थांबावे लागले. निवडणुकीत हिरे आणि फरांदे दोघींनी अपेक्षेपेक्षा दणदणीत मताधिक्याने विजय मिळवला. देवळालीतून अहिरे यांनाही मतदारांनी साथ दिली.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात ११७ उमेदवारांची अनामत जप्त

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने (शरद पवार) बागलाणमधून दीपिका चव्हाण, मुक्ताईनगरातून रोहिणी खडसे, जळगाव शहर मतदार संघातून शिवसेनेने (उध्दव ठाकरे) माजी महापौर जयश्री महाजन आणि पाचोऱ्यातून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. चौघींनाही यश मिळाले नाही. बागलाणमध्ये चव्हाण यांचा तर एक लाख ३० हजार मतांच्या फरकाने भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांनी पराभव केला. जळगाव शहर मतदारसंघात भाजपने आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. भोळेंच्या विरोधात उमेदवार देण्यात ठाकरे गटाने बराच उशीर लावला. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार माजी महापौर जयश्री महाजन यांना कमी वेळात जास्तीतजास्त मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. पक्षाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आधीच बंडखोरी केली होती, त्यात हकालपट्टी केलेले जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी त्यांच्या प्रचारात कुठेच सहभाग घेतला नाही. त्यामुळे महाजन यांना एकाकी शिलेदारासारखी निवडणूक लढवावी लागली. त्यांचा पराभव झाला.

पाचोरा मतदारसंघात ठाकरे गटाने दिवंगत माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांना मैदानात उतरविले होते. त्यांच्याविरोधात आमदार किशोर पाटील हे शिंदे गटाकडून उमेदवार होते. बहीण-भावातील या लढतीत सूर्यवंशी यांचा पराभव झालेला असला तरी त्यांना ५८,६७७ मते मिळाली. मुक्ताईनगररात शरद पवार गटाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. खडसे यांना पराभूत व्हावे लागले.

हेही वाचा : दरोड्याच्या तयारीतील दोघे ताब्यात

तृतीयपंथी शमिभा पाटील यांना ८४५३ मते

रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या रिंगणात होत्या. पहिल्यांदा एखाद्या तृतीयपंथी उमेदवाराने रावेरमध्ये विधानसभेची निवडणूक लढवल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. शमिभा यांना पाचव्या क्रमांकाची ८४५३ मते मिळाली.