सुंदर दिसत नाही आणि चेहऱ्यावर मेक अप टिकत नाही, या कारणावरुन नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील अंबड येथे घडली. दत्तनगर येथे ही घटना घडली असून अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दत्तनगर परिसरात माऊली चौक येथे रुखमा भास्कर खरचाण ( वय २७ ) ही नवविवाहिता राहत होती. बुधवारी सकाळी ८.३० वाजता पती कंपनीत कामावर गेल्यावर घरी कोणीच नसताना रुखमाने बाथरुममध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रुखमाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांना ही चिठ्ठी मिळाली आहे. ‘माझ्या डोळ्यातुन पाणी येत असल्याने काजळ डोळ्यात लावता येत नव्हते व सुंदर दिसत नसल्याने आत्महत्या करत आहे’, असे तिने चिठ्ठीत लिहिले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शांताराम शेळके करत आहेत.