नाशिक – आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनासंदर्भात आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या विभागांशी संबंधित प्रश्नांबाबत स्मार्ट सिटी, गोदा प्रदुषण समिती यासह अन्य काही कामांविषयी बैठक बोलावत आढावा घेतला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आगामी कुंभमेळयाच्या अनुषंगाने महापालिकेची तयारी या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी गेडाम यांनी पत्रकारांना माहिती दिली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे. यात महानगरपालिकेची भूमिका महत्वाची असेल. बैठकीत महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागाच्या वतीने कृती आराखडा सादर करण्यात आला. विभागनिहाय आराखड्यात कामाचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे. प्रत्येक विभागाचा एकमेकांशी समन्वय हवा. महानगरपालिकेचा बाहेरच्या विभागांशी योग्य तो समन्वय असावा, कामात सुसूत्रता असावी. साधुग्रामविषयी दर कुंभमेळ्यात प्रश्न उपस्थित होतो. यंदाही हा प्रश्न आहे. साधुग्राममधील जागा अधिग्रहित करायची असेल तर संदर्भातील अटी-शर्ती, भाड्याने घ्यायची असेल तर कोणते नियम हवेत, याविषयांवर लवकरच चर्चा केली जाईल, असे गेडाम यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके यांची निवड

प्रत्येक शहराला स्वत:चा असा सांस्कृतिक चेहरा असतो. कुंभमेळा काळात शहराचे हे सांस्कृतिक वैभव सर्वांसमोर येण्यासाठी फाळके स्मारक, बॉटॅनिकल गार्डन, गोदाघाट अन्य ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक ठेवा बाहेरून येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांसमोर यावा या अनुषंगाने काय करता येईल, सांस्कृतिक कार्यक्रम आदीविषयी चर्चा करण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये गोदा प्रदुषण, स्मार्ट सिटीशी संबंधित वेगवेगळ्या मुद्यांवर वेगवेगळ्या बैठका घेण्यात येणार आहेत. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी असून या संदर्भातील कृती आराखडा पाहता निधी संदर्भातील अहवाल लवकरच वरिष्ठ पातळीवर सादर केला जाईल, असे गेडाम यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notification to municipal corporation regarding preparation of kumbh mela nashik amy
Show comments