लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : पहेलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निरपराध पर्यटकांची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर आता ‘हिंदू खतरे में है’ असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही, असा टोला शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते सुभाष देसाई यांनी भाजपला हाणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्वाचा मोठा अभिमान बाळगतात. दीर्घकाळापासून त्यांच्या हाती देशाची सत्ता आहे. मात्र, ते दहशतवादी हल्ले रोखू शकले नसल्याचेही देसाई यांनी सांगितले.

चाळीसगाव तालुक्यातील बंजारा समाजाच्या मेळाव्यानिमित्त सुभाष देसाई बुधवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जळगावमधील अजिंठा विश्रामगृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपप्रणित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पहेलगाममध्ये निरपराध लोकांचे प्राण गेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांची व देशवासियांची नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे, असेही देसाई म्हणाले.

दरम्यान, आमदारांसह खासदार तसेच काही नेते हे पक्ष सोडून गेले असले, तरीही निष्ठावान शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे देसाई यांनी सांगितले. सध्या ठाकरे गटात आमदार, खासदार किंवा मोठ्या नेत्यांची कमतरता दिसते आहे. मात्र, त्यांची आम्हाला गरज नाही. कारण, पक्षासाठी शिवसैनिक व तळागाळातील कार्यकर्ते हीच खरी ताकद आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येत असतील तर जनतेसाठी ही दिलासादायक बाब आहे. व्यापक महाराष्ट्राचा विचार करता, दोघांच्या एकत्र येण्याने राज्याचे भलेच होईल. भाजपकडून महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही केले जात आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासह महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये नेण्यातही भाजपचा हात असल्याचा आरोप सुभाष देसाई यांनी केला.