लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : महिला सक्षमीकरण म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे असू शकते. बऱ्याचदा एखादी जोखमीची जबाबदारी महिलांना देतांना द्विधा मनस्थिती होते. मात्र नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची कार्यशैली यास अपवाद ठरली आहे. पोलीस तपासात महत्वपूर्ण मानल्या जाणऱ्या गुन्हे शोध पथकात (डीबी) महिला अंमलदाराची नियुक्ती करत महिला सक्षमीकरणाकडे पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये महिला अंमलदारांची नियुक्ती असली तरी त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जात नाही. आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस ठाण्यांअंतर्गत असलेल्या गुन्हे शोध पथकांमध्ये (डीबी) महिला पोलीस अंमलदारांचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, आयुक्तालय हद्दीतील १३ पोलीस ठाणे आणि एका पोलीस चौकीच्या गुन्हे शोध पथकात महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे शोध पथक असते. या पथकामार्फत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीसह गुन्ह्यांची उकल, गुन्ह्यांचा शोध घेतला जातो. अवैध धंद्यांविरोधात कारवाई केली जात असते. या पथकामध्ये प्रामुख्याने पुरुष पोलीस अंमलदारांचीच मक्तेदारी राहिली आहे. आतापर्यंत गुन्हे शोध पथकात महिला पोलीस अंमलदारांचा समावेश करण्यात आलेला नव्हता.

आणखी वाचा-नाशिक : चौक मंडईतील आगीत ४० पेक्षा अधिक वाहने खाक

आयुक्त कर्णिक यांनी महिला पोलीस अंमलदारांनाही ठाण्यातील महत्त्वाच्या जबाबदारीची संधी मिळावी. त्यांनाही गुन्ह्यांचा तपास, शोध यांची माहिती व्हावी, यासाठी महिला पोलीस अंमलदारांना गुन्हे शोध पथकांमध्ये समाविष्ठ करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तालय हद्दीतील १३ पोलीस ठाणे आणि चुंचाळे पोलीस चौकी येथील कार्यरत गुन्हेशोध पथकामध्ये महिला पोलीस अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे.

महिला पोलीस अंमलदारांनाही महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे गुन्हे शोध पथकांत महिला अंमलदारांची नियुक्ती केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील अशी अपेक्षा आहे. -संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त, नाशिक)

आणखी वाचा-नाशिकच्या जागेवर भाजपचा पुन्हा दावा

गुन्हे शोध पथकात असलेल्या महिला

वैशाली महाले (आडगाव), रोहिणी भोईर (पंचवटी), शुभांगी आवारे (म्हसरुळ), सोनाली काटे (सरकारवाडा), सोनम कातकाडे (भद्रकाली), कविता महाले (मुंबईनाका), अश्विनी खांडवे (गंगापूर), दिव्या देसले (सातपूर), अश्विनी भोसले (अंबड), अश्विनी पगार (इंदिरानगर), मयुरी विझेकर (उपनगर), संध्या कांबळे (नाशिकरोड), आर. एच. खाकले (देवळाली कॅम्प), दीपाली खर्डे (चुंचाळे) यांचा गुन्हे शोध पथकात समावेश करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now women are also in the crime investigation team in the police stations of the commissionerate mrj
Show comments