शहरातील ४९ संशयितांचे अहवाल नकारात्मक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा शंभरी गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत असून आतापर्यंत जिल्ह्य़ात ९९ करोनाचे रुग्ण आढळून आले  आहेत. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने शहरातील गोविंदनगर येथील दुसऱ्या करोनाबाधित रुग्णावर यशस्वी उपचार केले. त्याला सोमवारी जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. याच दिवशी करोनाबाधितांसह प्राथमिक लक्षणे असणाऱ्या ४९ संशयितांचे अहवाल नकारात्मक आले. या दिवशी नव्याने नऊ संशयित दाखल झाले.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात १३, डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय दोन आणि मालेगाव महापालिका रुग्णालयात सर्वाधिक म्हणजे ८४ असे एकूण ९९ करोनाबाधित रुग्ण आढळले. यातील आठ जणांचा मृत्यू झाला. दोन रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले.

आतापर्यंत ९२३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.  त्यातील ६११ जणांचे अहवाल नकारात्मक आले. शहरातील रुग्णालयात दाखल ४९ संशयितांचे अहवाल नकारात्मक आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

सध्या जिल्हा रुग्णालयात ११, डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात दोन आणि मालेगाव महापालिका रुग्णालयात ७७ असे एकूण ८९ जण उपचार घेत आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number of coronavirus positive cases in nashik district is around one hundred zws