जळगाव : जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी भागात कमी वयाच्या गर्भवतींची संख्या अलीकडे वाढली आहे. त्याबद्दल आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित यंत्रणेला दिले.जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामाध्यमातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्यासह जिल्हाभरातील तालुका आरोग्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करत असताना, आदिवासीबहुल भागातील कमी वयाच्या गर्भवतींची संख्या वाढल्याचा मुद्दा पटलावर आला. मुलींच्या विवाहासाठी निश्चित केलेल्या वयाचे पालन व्यवस्थित होत नसल्याने, सदरची समस्या निर्माण झाल्याचे चर्चेतून स्पष्ट झाले. विशेषतः भोंगऱ्या सणाच्या वेळी आदिवासींमध्ये विवाहाचे प्रमाण सर्वाधिक असते, त्याच दरम्यान कमी वयाच्या मुलींचे विवाह उरकले जातात, असे म्हटले जाते. अशा ठिकाणी जाऊन संबंधित यंत्रणेने त्यास तातडीने अटकाव घालावा. आदिवासींचे प्रबोधन करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, आशासेविका तसेच रेडक्रॉस संस्थेची मदत घ्यावी, असेही आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
पुरूष नसबंदीत जिल्हा पिछाडीवर
जळगाव जिल्ह्यास पुरूष नसबंदीसाठी यंदा ११ हजार ७४१ संख्येचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रत्यक्षात आजतागायत फक्त ४६०२ (३९ टक्के) इतकीच पुरूष नसबंदी झाल्याचे निदर्शनास आले आहे. यादरम्यान, किती शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतः नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे, असा प्रश्न जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित केला.