नाशिक – शहर परिसरात मकरसंक्रातीला पतंगबाजीला येणारे उधाण अनेकांच्या जीवावर बेतू शकत असल्याने शहर पोलीस सरसावले आहेत. पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा होणारा सर्रास वापर पाहता पोलीस ठिकठिकाणी छापे टाकून नायलॉन मांजा जप्त करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा एकच्या वतीने केलेल्या कारवाईत एक लाख ७२ हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे.
पतंगबाजीत नायलॉन मांजाचा होणारा वापर मानवी जिवितास धोका निर्माण करणारा आहे. याशिवाय पशु-पक्ष्यांच्या जीवाला बेतणारा आहे. या पार्श्वभूमीवर, नायलॉन मांजा विक्रीवर पोलिसांनी बंदी आणली आहे. स्थानिक गुन्हे शाखा एकच्या पथकाला मुंबई नाका येथील विहार सोसायरी प्रवेशद्वाराजवळील चहाच्या टपरीजवळ नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचत नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणारा अरबाज शेख (२४, रा. भद्रकाली) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एका प्लास्टिक गोणीत व खाकी रंगाच्या खोक्यात नायलॉन मांजा गुंडाळलेले २१५ नग आढळून आले. पोलिसांनी एक लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने त्याची चौकशी केली असता अहमद काझी (रा. बांद्रा) याच्याकडून मांजा आणल्याचे सांगितले. पोलिसांनी अरबाज आणि अहमद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अरबाजवर अंबड पोलीस ठाण्यात याआधीही बंदी असलेला मांजा विक्रीसाठी आणला म्हणून गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा : नाशिकमध्ये ४२ नायलॉन मांजा विक्रेते हद्दपार; शहर पोलिसांची कारवाई
नागरिकांनी पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.