लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : राज्यात बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयिताविरूद्ध भद्रकाली पोलिसांनी कारवाई केली असून १५,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मकरसंक्रातीनिमित्त शहरात पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. नायलॉन मांजाचा वापर केल्याने नागरिकांसह, पशु,पक्षी यांच्या जिवीताला धोका निर्माण होत आहे. नायलॉन मांजाला बंदी असली तरी छुप्या पध्दतीने त्याची विक्री आणि वापर होत असल्याचे आढळून येत आहे.
आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात हवालदारासह खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात
पोलिसांकडून नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. भद्रकाली परिसरात पद्माकर बकरे (रा.जुनी तांबट लेन) हे त्यांच्या घरी पतंग विकण्यासह नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता नायलॉन मांजा मिळून आला. सुमारे १५, ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.