वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिक्रिया
नाशिक : करोनाग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रुग्णालयांमध्ये रुग्णांना अंडी खाण्यावर भर देण्यात येत आहे. यावर काहींनी आक्षेप घेतला असून शाकाहारी किंवा अन्य रुग्णांना अंडे खाण्याची सक्ती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मार्चमध्ये करोना संसर्ग फैलावत असताना पहिल्या काही दिवसांमध्ये समाजमाध्यमांमधील अफवांमुळे अंडी वापरण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. यामुळे व्यावसायिकांना अंडी रस्त्यावर फेकण्याची वेळ आली होती. काही ठिकाणी तर व्यावसायिकांनी अंडय़ांचे मोफत वाटप के ले. अंडय़ांना बाजारपेठेत भाव मिळेनासे झाले होते. परंतु काही दिवसांपासून रुग्णांना अंडी देण्यावर आयुष विभागाकडून विशेष भर देण्यात येत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विविध औषधांबरोबर अंडी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. करोना कक्ष उपचार केंद्रात रुग्णांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवणात वरणभात, भाजीपोळी, मांसाहारी लोकांना चिकन किंवा अन्य मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी दिले जात आहेत. शाकाहारी रुग्णांना अंडय़ाची सक्ती केली जात आहे. यासाठी रुग्णालयांमध्ये एक उकडलेले अंडे १५ रुपयांना घेण्यात येत आहे. यावर वैद्यकीय मंडळींनी आक्षेप घेतला आहे.
महापालिके चे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी अंडय़ांमध्ये शरीराला उपयुक्त अशी प्रथिने असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंडे उपयुक्त असल्याचे सांगितले. ज्यांना अंडे नको, त्यांनी मोड आलेली कडधान्ये, सोयाबीन, मूग, मटकी खावी, असा सल्ला डॉ. नागरगोजे यांनी दिला. आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य विक्रांत जाधव यांनीही भूमिका मांडली. महाराष्ट्रातील आहार हा षड्रसयुक्त आहे. वरणात विविध डाळी वापरल्या जात आहेत. डाळीत प्रथिने आहेत. तसेच पोळ्या, बाजरीची भाकरी, ज्वारी तसेच सलाड असे वेगवेगळे पदार्थ आहेत. अंडे हे कफ वाढविणारे आहे. ते कधी शिजवले आणि खाल्ले यावर त्याची पचनशक्ती अवलंबून आहे. तसेच तापात अंडे देऊ नये, भूक कमी असताना अंडे देऊ नये. अंडय़ाला पर्याय देता यायला हवा, असे म्हणणे वैद्य जाधव यांनी मांडले.